

तासगाव : पोलिस येऊन आम्हाला गोळ्या घालू देत, नाही तर फाशी देऊ देत; परंतु ‘शक्तिपीठ’ला आमची एकही इंच जमीन देणार नाही, असा पवित्रा तासगाव तालुक्यातील शेतकर्यांनी गव्हाण (ता. तासगाव) येथे सोमवारी (दि. 7) झालेल्या बैठकीत घेतला.
बैठकीत संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणार्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती आहे. 100 ते 125 फूट खोल विहिरी आहेत, ज्या आता पाण्याने भरलेल्या आहेत. या भागातील अनेक पिढ्या येथील काळ्या जमिनी कसत आहेत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. या जमिनी महामार्गात गेल्यास पुढची पिढी देशोधडीला लागणार आहे. आपल्या भागातून मोजणीला आणि भू-संपादनास विरोध केला नाही तर पुढील शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून घाटनांद्रे, डोंगरसोनी, मणेराजुरी, तिसंगीसह कवलापूर आणि सांगलीवाडी भागातील सर्व शेतकर्यांनी तिसंगी आणि घाटनांद्रे येथील मोजणीवेळी उपस्थित राहून विरोध केलेला आहे.
बाहेरच्या गावांतील शेतकरी मोजणीला विरोधासाठी येथे थांबून राहात आहेत. तेव्हा आपणही केवळ आपल्या गावापुरता विरोध न करता सर्वच ठिकाणी हजर राहून मोजणीला विरोध करायला पाहिजे. कोणत्याही स्थितीत महामार्गाची मोजणी थांबवणे, हेच सर्वांसमोरचे मोठे काम आहे. आता पेरणी पूर्ण झाली आहे. इतर सर्व कामे थांबवावीत व मोजणीचे काम थांबवण्यासाठी सहभागी व्हावे. बैठकीला शरद पवार, माणिक पाटील, सुरेश शिंदे, सुनील पाटील, स्वप्निल टोकले, नितीन यादव, सिद्धेश्वर जमदाडे, नारायण सुतार, भास्कर सरोदे यांच्यासह गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, अंजनी, वज्रचौंडे गावांतील शेतकरी उपस्थित होते.