

तासगाव : नागपूर - गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीच्या शंभरपट जरी मोबदला दिला तरी आम्हांला शक्तिपीठ नको आहे, अशा संतप्त भावना तासगाव तालुक्यातील शेतकर्यांनी व्यक्त केल्या. या महामार्गाबाबत शेतकर्यांशी चर्चा करण्यासाठी अधिकार्यांनी शुक्रवारी बाधित गावातील शेतकर्यांची भेट घेतली.
आक्रमक शेतकर्यांनी अधिकार्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती तर केलीच, पण आमचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला, तर प्रसंगी रक्त सांडू, पण कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी शेतकर्यांनी दिला. नागपूर - गोवा हा शक्तिपीठ महामार्ग हा तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, अंजनी, गव्हाण, सावर्डे, सावळज, डोंगरसोनी, कवठेएकंद, मतकुणकी गावातून प्रस्तावित आहे. या महामार्गाच्या बाधित शेतकर्यांचा सुरुवातीपासूनच या महामार्गाला तीव्र विरोध आहे. यावेळी रवी साळुंखे, सचिन मांगले, रमेश कांबळे, सुनील कांबळे, धनाजी पाटील, नवीन पाटील, सुरेश शिंदे, महादेव पाटील, राहुल जमदाडे, बाळासाहेब लांडगे आदी शेतकरी उपस्थित होते.