Tasgaon Election: तासगावात बोगस मतदानावरून गदारोळ

आमदार रोहित पाटील, प्रभाकर पाटील आमने-सामने; कार्यकर्ते आक्रमक
Tasgaon Election |
Tasgaon Election: तासगावात बोगस मतदानावरून गदारोळPudhari Photo
Published on
Updated on

तासगाव शहर : येथे तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी बोगस मतदानावरून प्रभाग क्रमांक चार येथील मतदान केंद्रावर आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्या गटात जोरदार वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. मिरज उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा, तासगावचे पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी गर्दी हटवली.

याबाबत माहिती अशी की, तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये बोगस मतदान होत आहे, मतदारयाद्या विरोधकांनी आमच्याकडून हिसकावून घेतल्या, असा आरोप प्रभाग क्रमांक चारमधील एका केंद्रावर बसलेल्या उमेदवाराच्या प्रतिनिधींनी केला. दरम्यान, यावेळी आमदार रोहित पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना याबाबत विचारणा केली. बोगस मतदान असेल, तर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करा, कायदा हातात घेऊ नका, अशी विनंती पोलिसांनी केली.

दरम्यान, पोलिस आणि आमदार रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी झाली. यानंतर बोगस मतदानाचा आरोप झाल्याने प्रभाकर पाटील यांच्यासह कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. दोन्ही गटातील हजारो कार्यकर्ते समोरासमोर आले आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. गंभीर स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना दोन्ही गटांना वेगवेगळे घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला व मतदान सुरळीत पार पडू देण्याची विनंती केली. यानंतर काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. नंतर ते निवळले.

तासगावच्या जनतेचा कौल बघून आमदार रोहित पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे काही भाडोत्री गुंड आणून कार्यकर्त्यांना मारहाण, शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे रोहित पाटील यांचा सोज्वळ चेहरा किती खरा आहे हे दिसून आले. त्यांचा नम्रतेचा ढोंगीपणा तासगावकरांच्या समोर आला आहे.
- प्रभाकर पाटील, युवा नेते, तासगाव
लोकशाहीच्या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही विरोधकांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्यास तयार आहोत. बोगस मतदान करण्यासाठी मांजर्डे, हातनूर, पेड, हरिपूर, सांगली यासारख्या भागातून मतदारांची नावे लावलेली आहेत. मला विश्वास आहे, तासगावमधील जनता परिवर्तन घडवेल.
- रोहित पाटील, आमदार, तासगाव
आमदार रोहित पाटील यांनी त्यांच्या भाडोत्री गुंडांना घेऊन कार्यकर्त्यांना मारहाण केली. मतदारांचा अंदाज आल्यामुळे ते असले प्रकार करत आहेत. मात्र, जनता मतदानाच्या रूपाने त्यांना नक्की उत्तर देईल.
- संजय पाटील, माजी खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news