

मिरज : येथील प्रांत कार्यालयात गेल्या दहा वर्षांपासून लिपिक म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले तलाठी सुखदेव गजानन डोईफोडे (नाना) (वय ५०) यांनी बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
डोईफोडे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रहिवासी होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली अथवा अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येते. ते दोन दिवसांपासून कामावरही गेले नव्हते. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी पत्नीला काही कामासाठी घराबाहेर पाठवले. त्यानंतर त्यांनी घरातील पंख्याला गळफास लावून घेतला. काही वेळाने पत्नी घरी परतल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणी मिरज शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.