

विटा; पुढारी वृत्तसेवा : तीन हजार रुपयांची लाच घेताना सांगली जिल्ह्यातील करंजे (ता. खानापूर) येथील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यास मंगळवारी (दि. ११) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. मंडळ अधिकारी शशिकांत ज्ञानदेव ओमासे (वय ४६) आणि तलाठी विजय शंकर ओमासे (वय ३६) अशी दोघा अधिकारींची नावे आहेत. जमिनीच्या दस्ताची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी ही लाच घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी संबंधित जमीन मालकाच्या मुलाने सांगलीच्या लाचलुचपतपद विभागाकडे तक्रार दिली होती.
याबाबत संबंधित लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील करंजे येथील तक्रारदाराच्या वडिलांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीबाबत विट्याच्या प्रांत कार्यालयात आणि सांगलीच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल होता. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागल्यानंतर या निकाल पत्रान्वये आपल्या वडीलांचे नाव सातबारावर नोंद होण्यासाठी तक्रारदाराने करंजेतील तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. ही नोंद घेवून मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी शशिकांत ओमासे आणि तलाठी करंजे विजय ओमासे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधित तक्रारदाराने मंगळवारी (दि. ११) सकाळी तक्रारी अर्ज सांगलीच्या अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकास दिली होती.
दरम्यान, मंगळवारी मंडळ अधिकारी शशिकांत ओमासे यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती पाच हजार राहू द्या तीन हजार रुपये तरी द्या अशी मागणी केली. त्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून तीन हजार रुपये रोख रक्कम घेताना मंडळ अधिकारी शशिकांत ओमासे आणि तलाठी विजय ओमासे यांना रंगेहाथ पकडले. दरम्यान तक्रारदाराकडून तीन हजाराची लाच मागणी केल्याचे आणि ती स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी शशिकांत ओमासे आणि तलाठी विजय ओमासे या दोघांच्या विरुध्द विटा पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप अधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार विनायक भिलारे,प्रितम चौगुले, अजित पाटील, सलिम मकानदार, उमेश जाधव, पोपट पाटील, हरीभाऊ वाघमोडे, रविंद्र धुमाळ, सिमा माने, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, चालक अनिस वंटमुरे यांनी केली आहे.