

कडेगाव : शक्तिपीठ हा महामार्ग विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून जाणार आहे, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग होणार आहे. परंतु या महामार्गाबाबत शेतकर्यांच्यात नाराजी आहे. तेव्हा या महामार्गाबाबत सरकारने स्थानिक शेतकर्यांना विश्वासात घ्यावे, त्यांचे प्रश्न आणि अडचणी, समस्या समजून घ्याव्यात, मगच या महामार्गाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली.
कदम म्हणाले, प्रस्तावित महामार्गाच्या परिसरातील गावांमध्ये शेतकर्यांच्या पिकावू जमिनी आहेत, विशेषत: यामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या जमिनी ज्या जाणार आहेत, त्याबाबत येथील शेतकर्यांशी शासनाने चर्चा केली पाहिजे. कारण सांगली आणि कोल्हापूर जिल्हे हे राज्यात ऊस उत्पादनात आघाडीवर आहेत. त्यामुळे त्या शेतकर्यांच्या पिकावू चांगले उत्पादन देणार्या जमिनीचे नुकसान किती होणार, याबाबत त्यांच्याशी बोलणे केले पाहिजे, त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यानंतरच सरकारने शक्तिपीठ महामार्गाबाबत निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग हा विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत होत आहे. मात्र हा महामार्ग ज्या शेतकर्यांच्या जमिनीतून जाणार आहे, त्यांचे नुकसान किती होणार? याबाबत सरकारने अभ्यास करणे गरजेचे आहे.