

सांगली ः गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन 200 रुपये हप्ता आणि चालूवर्षी उचल 3 हजार 700 रुपये द्यावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. त्यावर तोडगा काढण्यास कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी 9 डिसेंबर रोजी बैठक बोलावली आहे. साखर आयुक्त यांच्या आदेशानुसार बैठक होत आहे. अशीच बैठक सांगली जिल्हाधिकार्यांनी घ्यावी, अशी मागणी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 25 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये 2023 - 24 गळीत हंगामातील 200 रुपये अंतिम हप्ता व गळीत हंगामाची 3 हजार 700 रुपयांची प्रतिटन पहिली उचल मागितली आहे. चालू हंगामात साखर कारखान्यांनी पहिल्या 50 दिवसात कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा. पुरामध्ये बाधीत झालेल्या उसास प्राधान्याने पहिल्यांदा तोड देण्यात यावी. ऊस तोडणी मजुरांची मजुरी वाढली आहे. तोडणी वाहतूक एफआरपीमधून कपात केली जातेय, तरीही तोडणीसाठी शेतकर्यांकडून एकरी 5 ते 10 हजारांची मागणी केली जात आहे. त्यामुळे शेतकर्यांची लूट करणार्यावर कडक कारवाई करावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील कारखान्यांना ऊसदराबाबत निवेदन दिले आहे. पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. जिल्हाधिकारी यांनी याची दखल घ्यावी. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.