

ईश्वरपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील सराफी दुकान फोडून सोन्या-चांदीचे ऐवज, रोकड चोरणाऱ्या टोळीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. गुरुवार, दि. 18 रोजी सांगलीवाडी येथील टोलनाक्याजवळ सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन तोळे सोन्याचे दागिने, 3 किलो 440 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोकड, दोन दुचाकी, असा 10 लाख 41 हजार 614 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
प्रदीप हणमंत थोरात (वय 36, रा. मळीभाग, बोरगाव, ता. वाळवा), गणेश ऊर्फ अजित शांताराम मागनगिरी (वय 30, रा. सांगोले, ता. खानापूर), सुरेश गंगाराम कोळी (वय 25, रा. गंजीमाळ, संभाजीनगर, कोल्हापूर) व आकाश अंकुश सावंत (वय 30, रा. लेंगरे, ता. खानापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचा साथीदार राजकुमार भरत मच्छवे (रा. दरफळ, जि. धाराशिव) हा फरार आहे. अटक केलेल्या चौघांना शुक्रवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ताकारी येथील बस स्थानकाजवळील महालक्ष्मी या सराफी दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, 10 हजारांची रोकड, असा 9 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. शनिवार, दि. 13 रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सराफी दुकानदार महेश पाटील (रा. बांबवडे, ता. पलूस) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यांनी तपासासाठी पथक तयार केले होते. गुरुवारी पथक गस्त घालत असताना सांगलीवाडी टोलनाका परिसरात चारजण चोरीचे दागिने विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून तेथे संशयितरीत्या फिरणाऱ्या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दागिने सापडले. चौकशीदरम्यान त्यांनी ताकारी येथील चोरीची कबुली दिली.
पोलिस निरीक्षक संजीव झाडे, पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, सहायक निरीक्षक रूपाली बोबडे, हवालदार संदीप पाटील, संदीप गुरव, अतुल माने, अरुण पाटील, मच्छिंद्र बर्डे, प्रकाश पाटील, उदयसिंह माळी, रणजित जाधव, अनिल कोळेकर, सागर लवटे, नागेश खरात, सागर टिंगरे, शिवाजी शिद, प्रतीक्षा गुरव, अभिजित माळकर, सूरज थोरात, विनायक सुतार, पवन सदामते, संकेत कानडे, करण परदेशी, अभिजित पाटील, अजय पाटील, दीपक घस्ते, विशाल पांगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.