

वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ‘सुभेदार’ या नर वाघाने राधानगरी ते चांदोली असा अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे. दीड महिन्यात त्याने हा प्रवास केला आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानात अधिवास असलेला हा वाघ जानेवारी महिन्यात राधानगरी वन्यजीव अभयारण्य परिसरात दिसून आला होता. राधानगरीत बसवलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचा व्हिडीओ टिपला गेला होता. शरीरावरील पट्टेरी रचनेवरून त्याची ओळख निश्चित करण्यात आली. साधारण महिनाभर तो राधानगरीत वास्तव्यास होता. त्यामुळे तो तिथेच स्थिरावेल, असे वाटत असतानाच त्याने पुन्हा सह्याद्रीकडे मार्गक्रमण केले. चांदोली ते राधानगरी हे अंतर सरळ रेषेत सुमारे 100 किलोमीटर आहे. मात्र वाघ सरळ रेषेत प्रवास करत नाही. जंगलातील नैसर्गिक मार्ग, अडथळे आणि अधिवास लक्षात घेता, सुभेदारने ये-जा करत अंदाजे 250 किलोमीटर अंतर पार केले असावे, असा अंदाज आहे.
‘चंदा’कडून गुड न्यूजची अपेक्षा
‘ताडोबा’तून आणलेल्या ‘चंदा’ला चांदोलीत सोडण्यात आल्यानंतर तिने सुमारे 35 ते 40 चौरस किलोमीटर परिसरात आपली हद्द निश्चित केली आहे. तिच्या टेरिटरी मार्किंगनंतर सेनापती तिच्याजवळ पोहोचला. जवळपास महिनाभर दोघांनी एकत्र वास्तव्य केले. सध्या चंदा आपल्या हद्दीत एकटीच फिरताना दिसत असून तिच्या शारीरिक स्थितीत बदल जाणवत आहे.