सांगली : बारावी तर झाली, पण आता पुढं काय करायचं? कोणता कोर्स घ्यायचा? कोणतं क्षेत्र निवडायचं? नेहमीचीच पदवी घ्यायची, की नवीन काही करायचं? सांगलीतील कॉलेजलाच जायचं, की पुण्या- मुंबईला जायचं? कुठल्या संस्थेत प्रवेश घ्यायचा? आपणाला जमेल का? खर्च परवडेल का? इतकं करूनही नंतर नोकरी मिळेल का..? या आणि अशा असंख्य शंकांना योग्य उत्तरे आम्हाला ‘दै. पुढारी एज्यु. दिशा’मध्ये मिळाली. खूप चांगल्या आणि नवनवीन अभ्यासक्रमांची माहिती मिळाली. त्यामुळं आता भीती, दडपण जाऊन, आत्मविश्वास आला आहे. धन्यवाद दैनिक पुढारी..! अशी भावना अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
काल, रविवारी तिसर्या आणि अंतिम दिवशीही या प्रदर्शनाला विद्यार्थी आणि पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनामुळे आम्हाला करिअरची नवी आणि योग्य दिशा सापडल्याची भावना विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली. सांगलीत राम मंदिर चौकातील कच्छी जैन भवनमध्ये आयोजित ‘दै. पुढारी एज्यु. दिशा’ या बहुप्रतीक्षित शैक्षणिक प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातून, ग्रामीण भागातून आलेले असंख्य विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. रविवारी तर सकाळपासून रात्रीपर्यंत प्रदर्शन फुल्ल झाले होते. प्रदर्शनस्थळी आलेल्या नामांकित शिक्षण संस्थांच्या कक्षांना विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून भेट देत, या संस्थांमधून चालविल्या जाणार्या विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली. वेगवेगळ्या क्षेत्रात अत्याधुनिक अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली मिळण्यासाठी ‘दैनिक पुढारी’ने आयोजित केलेले ‘एज्यु. दिशा’ प्रदर्शन महत्त्वाचे, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याची भावना विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन यानिमित्ताने त्यांना मिळाले.