

सांगली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेतली जाणाऱ्या ‘नीट युजी 2026’ परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 मार्च आहे. मात्र दोन दिवसात ‘एनटीए’चा सर्व्हर सतत डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या बारावी बोर्ड परीक्षा सुरू असल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा आणि नीट अर्ज प्रक्रिया यामध्ये समतोल साधताना अडचणीत सापडले आहेत. सर्व्हर डाऊनमुळे अनेक विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यात अर्ज प्रक्रिया पूर्ण करता न आल्याने चिंतेचे वातावरण आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही परीक्षा 3 मेरोजी होणार आहे. अर्जामध्ये काही त्रुटी राहिल्यास विद्यार्थ्यांना 12 मार्चपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार आहे.
2019 पासून वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट परीक्षा अनिवार्य आहे. यंदापासून फिजिओथेरेपी अभ्यासक्रमासाठीदेखील ही परीक्षा देणे आवश्यक करण्यात आले आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, या विषयांवर आधारित 720 गुणांची ही परीक्षा तीन तासांची असून ती देशातील 552 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यापैकी महाराष्ट्रात 35 शहरांमध्ये परीक्षा केंद्रे असणार आहेत.
गेल्या वर्षी देशभरातून 22,09,318 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 12,36,531 विद्यार्थी पात्र ठरले होते. परीक्षा केंद्रांवरील गोंधळ टाळण्यासाठी यावर्षी अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे लाईव्ह फोटो घेण्याची प्रणाली लागू केली आहे. तोच फोटो विद्यार्थ्यांच्या ॲडमिट कार्डवर दिसणार आहे. दरम्यान, पालक आणि करिअर समुपदेशकांनी ‘एनटीए’ने आपली डिजिटल पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात सर्व्हर डाऊन झाल्यास विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण येतो, असे त्यांचे मत आहे.
विशेषतः बोर्ड परीक्षा सुरू असताना अशा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवणे आणि तांत्रिक व्यवस्था अधिक मजबूत करणे आवश्यक असल्याचे आरंभ करिअर अकॅडमीचे ऋषिकेश जगधने यांनी सांगितले.