

आष्पाक आत्तार
वारणावती : चांदोली अभयारण्य परिसरातील केवळ दीड-दोन हजार लोकसंख्या असलेल्या पांढरे पाणी (ता. पाटण) या दुर्गम गावातील सीमा भागोजी शेळके या विद्यार्थिनीने जद्द आणि चिकाटीच्या जोरावर थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत (इस्त्रो) पोहोचण्याचा मान मिळवला. इस्त्रोला भेट देणार्या 100 विद्यार्थ्यांमध्ये सीमाचा समावेश झाला आहे.
राज्यात विजाभज आश्रमशाळा, विद्यानिकेतन शाळा, ऊसतोड कामगारांच्या शाळेतील निवासी विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबद्दल अधिक माहिती मिळावी, या क्षेत्रात स्वारस्य निर्माण व्हावे, तसेच विद्यार्थ्यांना इस्रोची यशोगाथा आणि विज्ञान जागृत करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने राज्यातील शंभर विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस भेटीचा उपक्रम राबवला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांची लेखी चाचणी घेऊन यातील शंभर विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड केली. यात सीमा शेळकेची वर्णी लागली.
सीमाचे बालपण अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत गेले. वडील हमाली करून संसाराचा गाडा चालवत होते. सीमा दहावीत असताना त्यांचे निधन झाले. संसाराची जबाबदारी आईवर पडली. आई अशिक्षित, दुर्गम भागात वसलेले गाव. त्यामुळे रोजगार नाही. चार मुलींना जगवायचं कसं? म्हणून तिने थेट मुंबई गाठली. धुणी-भांडी करून संसाराचा गाडा कसा बसा हाकायला लागली. परिस्थितीची जाणीव असल्यामुळे सीमा मनापासून अभ्यास करायची. कोणत्याही क्लासेसशिवाय दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवून तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. रत्नागिरी जिल्ह्यातील निवे बुद्रुक येथे आश्रमशाळेत पहिली ते तिसरी, तर चिकुर्डे येथील आश्रमशाळेत चौथी ते सातवीपर्यंत तिचे शिक्षण झाले. आठवीपासून इस्लामपूरच्या सद्गुरू उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ती शिकते आहे. सध्या बारावीच्या वर्गात ती शिक्षण घेत आहे.
विभाग प्रमुख महेश बाबर, सुहासनी शिरोटे, निशिकांत धुमाळे, प्रतिभा पाटील, अजित पवार, तेजस्विनी जाधव, सोनाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तिने इस्त्रो भेटीसाठी पात्रता सिध्द केली. संस्थापक सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव सत्यजित जाधव, संचालक रणजित जाधव, मुख्याध्यापक सचिन पाटील यांनी तिचा सत्कार करून सन्मानित केले.