

मसूर : नीट परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून शेरे स्टेशन (ता. कराड) येथील १८ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी वड्या खाऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.समीक्षा दीपक पवार असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. कराडच्या कृष्णा रुग्णालयात तिला दाखल केले होते. मात्र, सोमवारी (दि.२७) तिचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीची नीट परीक्षा तिने दिली होती. मात्र, अपयश आल्याने ती मानसिक तणावासह नैराश्यात होती. त्याच अवस्थेत तिने गुरुवारी (दि.२३) उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी वड्या खाल्ल्या. मात्र, ही बाब तिने सुरुवातीला घरातील कोणालाही सांगितली नव्हती. दोन दिवसांनंतर विषाचा परिणाम शरीरावर होऊ लागल्याने तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यावेळी तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. नातेवाईकांनी तातडीने रविवारी (दि. २६) तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी तिची प्राणज्योत मालवली. तपास मसूर हवालदार सुनील पन्हाळे करीत आहेत.