

जत : सनमडी (ता. जत) येथील प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक विनोद परसू जगधने (वय 52) याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या पालकांनी शनिवारी रात्री उशिरा उमदी पोलिसांत दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित जगधने याच्यावर ‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी तथा सहायक निरीक्षक संदीप कांबळे यांनी संशयितास तत्काळ अटक केली. त्यास आज, रविवारी ‘पोक्सो’ न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
आश्रमशाळेतील अत्याचाराचा प्रकार 18 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. पीडित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानंतर संशयिताने, याबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नराधम मुख्याध्यापक विनोद जगधने हा आश्रमशाळेस सुटी लागल्याने बुधवारी पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीस घरी सोडण्यासाठी गेला होता.
यावेळी पालकांनी त्याला पीडित मुलीवरील अत्याचाराबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यास बेदम चोप दिला. हा प्रकार दैनिक ‘पुढारी’ने शुक्रवारी चव्हाट्यावर आणल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका धनश्री भांबुरे यांनी तातडीने आश्रमशाळेस भेट दिली. संबंधित शिक्षकांचे बंद खोलीत जबाब घेतले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनीही नराधमावर कडक कारवाईच्या सूचना प्रशासन व पोलिसांना दिल्या.
दरम्यान, चार ते पाच मुलींवर अत्याचार झाल्याची शंका उपस्थित करण्यात आली. सध्या शाळेला सुटी असल्याने संबंधित मुलींच्या घरी जाऊन जबाब घेण्यात आले.
याबाबत धनश्री भांबुरे म्हणाल्या, सनमडी येथील घटनेची माहिती मिळताच आपण तातडीने सर्व शिक्षक- शिक्षिकांकडून माहिती घेतली. काही मुलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याची खातरजमा केली जात आहे. सध्या शाळेला सुट्या लागल्याने मुली घरी गेल्या आहेत. त्यांना विश्वासात घेऊन जबाब नोंदविले जात आहेत.
शुक्रवारी प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांनी, आठवी ते दहावीच्या वर्गांची मान्यता नसताना विद्यार्थिनी निवासी कशा ठेवल्या, याबाबत विचारणा संचालिका धनश्री भांबुरे यांना केली. यावेळी त्यांनी, असे करता येत नसल्याचे स्पष्ट केले. आठवीच्या वर्गाची मान्यता असल्याचे संस्थाचालक सांगत आहेत, मात्र ही वस्तुस्थिती नाही. त्याची खातरजमा करावी. पोलिसांनी शाळा परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करावी. यानंतर नेमका प्रकार समोर येईल, असे पवार म्हणाले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकाने मुलीस संबंधित आश्रमशाळेत शिक्षणासाठी ठेवले होते. याचा गैरफायदा मुख्याध्यापकाने घेतल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी केली. पोलिसात तक्रार देण्यास अजूनही काही पालक धजावत नाहीत.
दरम्यान, अन्य काही विद्यार्थिनींवर अत्याचार झाले आहेत का, याचा कसून तपास पोलिस करत आहेत. असे काही प्रकार घडले असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निरीक्षक संदीप कांबळे यांनी केले आहे.
शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी शुक्रवारी सर्वप्रथम दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर जत तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली. यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभाग व पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. गेले दोन दिवस सर्व अधिकारी पीडित विद्यार्थिनी व पालकांचे जबाब घेत होते. यानंतर शनिवारी रात्री उशिरा उमदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार 75, 76, 351(2) व बालकांचे लैंगिक शोषण अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 अन्वये 8, 10, 12 (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.