

कुपवाड : येथील बसस्थानकासमोर खेळणाऱ्या विहान नीलेश तरडे (वय ५, रा. कुपवाड) या पाच वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला केला. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला नातेवाईकांनी तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
कुपवाड शहरासह विस्तारित परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांबरोबरच मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोकाट गाढवे आणि घोड्यांचा वावर वाढल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या आवारातील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मात्र, प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा तीव्र आरोप नागरिक करत आहेत.
महापालिकेची ‘डॉग व्हॅन’ सध्या ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी ठरली आहे. शहरात डॉग व्हॅन दाखल होताच मोकाट कुत्री पसार होतात, तर अनेकदा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कुत्री पकडलीच जात नाहीत. वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून, महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.