

सांगली ः सांगली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात शुक्रवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. ऐन दिवाळीत पाऊस आल्याने शेतकर्यांची तारांबळ उडाली. खरिपाच्या काढलेल्या पिकांना व फ्लॉवरिंग अवस्थेतील द्राक्षबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
पाऊस संपला, असे वाटत असतानाच बुधवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास सांगली शहरात काहीकाळ जोरदार पाऊस झाला. त्याशिवाय जिल्ह्यातील विविध ठिकाणी पहाटेच्या वेळी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अनेक भागात शेतकर्यांनी खरिपातील पिकांची काढणी केली आहे. खरीप ज्वारी, कडधान्ये काढणीस आलेली आहेत. काही ठिकाणी काढून ती शेतात ठेवलेली आहेत. याशिवाय ज्वारीचा कडबा शेतातच आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी नुकसानही झाले आहे.
सध्या द्राक्षाच्या पीक छाटणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकर्यांनी द्राक्षाची पीक छाटणी केल्यानंतर द्राक्षे फ्लॉवरिंग अवस्थेत आहेत. या पावसामुळे मणीगळ व मणीकूज होण्याचा धोका वाढला आहे. याबाबत द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील म्हणाले, अवकाळी पावसामुळे बागायतदार चिंतेत आहेत. शुक्रवारी पाऊस झाल्यानंतर लगेच उघडीप दिली. त्यामुळे फारसे नुकसान नाही. मात्र सतत पाऊस सुरू राहिल्यास नुकसान होण्याचा अधिक धोका आहे. पुढील चार-पाच दिवस ढगाळ वातावरण असेल व रविवारी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.