आटपाडी : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी साई मंदिर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी सहायक अभियंता विशाल मोहिते यांनी एक महिन्यात काम सुरू करण्याची लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आटपाडी शहरातील साई मंदिर चौक ते बसस्थानक - नगरपंचायत ते तहसील कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी जानेवारी महिन्यात विशेष बाब म्हणून 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत; पण काम अद्याप सुरू झालेले नाही. शहरातील हा मुख्य रस्ता असून, कराड ते पंढरपूर मार्गावरील या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. तसेच वाहनधारक आणि नागरिकांचे हाल होत आहेत.
बुधवारी सकाळी महेश पाटील, डी. एम. पाटील, गणेश हाके, भारत सागर, खंडू ढोबळे, सूर्यकांत दौंडे, विकास डिगोळे, रमेश टकले, काकासाहेब जाधव आणि संतप्त नागरिकांनी साई मंदिर चौकात रास्ता रोको केला. सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलनामुळे कराड -पंढरपूर रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. आंदोलनामुळे एस.टी. बस वाहतुकीवरही परिणाम झाला. बांधकाम खात्याचे अभियंता बुरुंगले, नगरपंचायत सीईओ वैभव हजारे, पोलिस यांनी आंदोलकांशी चर्चा केली; मात्र चर्चा अयशस्वी ठरली. त्यानंतर सहायक अभियंता विशाल मोहिते यांनी लवकरच कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि एक महिन्यात काम सुरू करण्याची लेखी हमी दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतप्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, डॉक्टर, वकील, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले होते.