

इस्लामपूर : अलमट्टीतील पाणीसाठ्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेती, घरांचे नुकसान तसेच जीवित हानी होत आहे. त्यामुळे अलमट्टीची उंची आणखी वाढवू नका, ही भूमिका ताकदीने केंद्रीय मंत्र्यांसमोर आणि सर्वोच्च न्यायालयात वकिलांच्या माध्यमातून सरकारने मांडली आहे. सरकार कदापी अलमट्टीची उंची वाढवू देणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
पाटील म्हणाले, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पूरस्थितीला अलमट्टी धरणातील पाणीसाठाच कारणीभूत आहे, हीच वस्तुस्थिती आहे. प्रत्येकवर्षी पुरामुळे होणारे नुकसान न परवडणारे आहे. अलमट्टी धरणाची उंची आणखी वाढली तर पुराचा धोकाही वाढणार आहे. त्यामुळे आहे त्यापेक्षा धरणाची उंची वाढवू नये, अशी मागणी आम्ही केली आहे. राज्य सरकार ही मागणी न्यायालयातही लावून धरत आहे. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रसाद पाटील उपस्थित होते.