

सांगली : एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्डची सक्ती केल्यामुळे बससेवेत गोंधळ उडाला असून, वाहक आणि सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांमध्ये वादावादी होत आहे. वाहकांनी कामावर बहिष्काराचे हत्यार उपसताच ३० सप्टेंबरपर्यंत पूर्वीप्रमाणे ऑफलाइन सवलत देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. एसटीसाठी एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून सवलत मिळविण्याची प्रक्रिया ‘वाईमार्गे सातारा’ ठरत असल्याची भावना प्रवाशांत आहे. कर्नाटकमध्ये केवळ आधारकार्ड दाखविल्यानंतर सवलत दिली जाते. मात्र, महाराष्ट्रात एनसीएमसी कार्डची सक्ती करण्यात आली आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन व्यवस्था सुरू होताच सर्व्हरवरील ताण, नेटवर्कच्या अडचणी आणि कार्ड उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक ठिकाणी सवलतीच्या तिकिटासाठी आलेल्या प्रवाशांना पूर्ण भाडे भरावे लागल्याने वादावादी झाली. त्यानंतर एसटीने ३० सप्टेंबरपर्यंत तात्पुरती ऑफलाइन सवलत सुरू केली आहे.
या कार्डच्या नोंदणी व वितरणासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेडमार्फत एसटी आगार, बसस्थानके आणि अधिकृत एजंटांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्डसाठी १९९ रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. त्यानंतर टॉपअप (रिचार्ज) करावे लागते. अनधिकृत एजंटांकडून १९९ रुपयांच्या कार्डसाठी चारशे ते पाचशे रुपये घेतल्याच्या तक्रारी आहेत.
एनसीएमसी कार्डसाठी आधारकार्ड, विद्यार्थ्यांसाठी सरल क्रमांक, तर दिव्यांगांसाठी वैध ओळखपत्र व यूडीआयडी जोडणे आवश्यक आहे. रिचार्ज कुठे व कसे करायचे, याबाबतही प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. केवळ आधारकार्ड, विद्यार्थ्यांचे ओळखपत्र किंवा दिव्यांगांचे यूडीआयडी असताना सवलत देता येत असताना प्रक्रिया किचकट का करण्यात आली, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. तसेच कार्डसाठी खासगी कंपनीला १९९ रुपये का द्यायचे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या आहेत अडचणी...
सर्व्हर डाऊन व रिचार्जबाबत संभ्रम.
इंटरनेट व नेटवर्कच्या अडचणी.
कार्ड तपासणी आणि तिकीट देण्यास विलंब.
प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बस थांबवावी लागत असल्याने प्रवासाला विलंब.
क्यूआर कोडद्वारे पैसे भरण्याची सुविधा असताना एनसीएमसी कार्डची सक्ती कशासाठी?, असा सवाल.