Miraj Accident : मिरज-बेडग रस्त्यावर ट्रकने मेंढ्यांना चिरडले

२५ मेंढ्यांचा जागीच मृत्यू, २५ गंभीर जखमी : विदारक चित्र
Miraj Accident
मिरज-बेडग रस्त्यावर ट्रकने मेंढ्यांना चिरडलेPudhari Photo
Published on
Updated on

बेडग : मिरज-बेडग मार्गावर शनिवार, दि. २५ रोजी झालेल्या भीषण अपघातात १६ चाकी ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसल्याने २५ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत मेंढपाळाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

निपाणी येथील मेंढपाळ धोंडिराम दुधाने हे आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन मिरज-बेडग रस्त्याने मिरजेच्या दिशेने जात होते. यावेळी आरग बाजूकडून येणाऱ्या १६ चाकी ट्रकच्‍या (क्र. एमएच १० सीआर ९२४६) चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण गमावले. त्यामुळे ट्रक थेट रस्त्याकडेला असलेल्या मेंढ्यांच्या कळपात घुसला. ट्रकच्या चाकाखाली आल्याने २५ मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर २५ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आपल्या डोळ्यांसमोर निष्पाप जनावरांचा तडफडून झालेला मृत्यू पाहून मेंढपाळ दुधाने यांना अश्रू अनावर झाले.

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. घटनास्थळी अतिशय विदारक चित्र होते. मेलेल्या मेंढ्यांचा खच रस्त्यावर पडला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news