

सोलापूर ः जिल्ह्यातील पाच बालविवाह रोखण्यात ग्रामीण पोलिस दलाला यश मिळाले. मोहोळ, पंढरपूर, वैराग व वळसंग येथे कारवाई केली. या मुलींना बालसुधारगृहात दाखल करण्यात आले.
मोहोळ पोलिस स्टेशन हद्दीत दोन सख्या अल्पवयीन बहिणींचा विवाह रविवारी (10 मे) होणार असल्याची माहिती मिळताच मोहोळचे पोलिस उपनिरीक्षक सचिन माळी, उमेश पवार, सिंधू थोरात व महिला पोलिस अश्विनी घोलप यांनी तातडीने दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.
वळसंग पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे यांना 14 वर्षीय मुलीच्या विवाहाची माहिती मिळाल्यावर रात्री 9:47 वाजता पोलिस उपनिरीक्षक रविराज कांबळे, हेडकॉन्स्टेबल बसवराज अष्टगी, हेडकॉन्स्टेबल अश्विनी गोटे व चालक संतोष कुंभार यांनी संबंधित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. पंढरपूर येथे 7 मे रोजी मध्यरात्री बालविवाह झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी कागदपत्रांसह संबंधित मुलीला समितीसमोर सादर केले. वैराग पोलिस स्टेशन हद्दीतही विवाह रोखला.
यांनी रोखले बालविवाह
उपविभागीय पोलिस अधिकारी तथा स्पेशल ज्युवेनाईल पोलिस युनिटचे प्रमुख संकेत देवडळेकर, पोलिस निरीक्षक बालाजी पवार, पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, पंढरपूरचे सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक रविराज कांबळे पोलिस उपनिरीक्षक सचिन माळी, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंग जाधव यांनी सतर्कता दाखवित हे बालविवाह रोखले.