

विटा : पुढारी वृत्तसेवा
समाजातील भेदभाव, विषमता, सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध आजच्या समाजाने लढले पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. मृणालिनी आहेर यांनी व्यक्त केले.येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठामध्ये क्रांतिदिन साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. श्रीमंत कोकाटे, संस्थेचे अध्यक्ष सुभाष पवार, संघटक अॅड. सुभाष पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व 8 वी, बालवैज्ञानिक डॉ. होमी भाभा या परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले. सुरुवातीला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच उपस्थितांच्याहस्ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
प्रा. श्रीमंत कोकाटे म्हणाले, समाजातील विषमता नष्ट झाली पाहिजे. अलीकडच्या काळात मोबाईलमुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. त्याचे दुष्परिणाम सांगून वाचनाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. अॅड. सुभाष पाटील यांनी प्रा. डॉ. मृणालिनी आहेर यांच्या कार्याची ओळख करून दिली. सूत्रसंचालन रोहिणी पाटील यांनी केले. क्रांतिदिनाचे महत्त्व व क्रांतिसिंह जयंती सप्ताहाचा आढावा उज्ज्वला पाटील यांनी घेतला. प्रास्ताविक विजयकुमार महिंद यांनी केले. आरिफ देसाई यांनी आभार मानले. सचिव अॅड. नानासाहेब पाटील, अॅड. स्वाती पाटील, इंद्रजित पाटील, अॅड. सुरेश पवार, संपतराव पवार, मकरंद पाटील, स्नेहल पवार, संगीता पाटील, आनंदी पाटील, रवींद्र कांबळे, रणजित पाटील, सागर पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
डॉ. आहेर यांनी सांगितले, समाजातील भेदभाव, विषमता, सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध आजच्या समाजाने लढले पाहिजे. संविधानातील तत्त्व, विचार, मूल्ये लक्षात घेऊन आपल्या वृत्तीतून, कृतीतून महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे.