

सांगली : एकाच विषयावर सखोल अभ्यास केल्यास मानव कल्याणासाठी योगदान देता येते. सखोल, सातत्यपूर्ण संशोधनातूनच समाजहित साध्य होते, असे मत शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जे. पी. जाधव यांनी व्यक्त केले.
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेजच्यावतीने आयोजित दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद झाली, याचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. परिषदेत विविध देशांतील 593 नामांकित शास्त्रज्ञ, संशोधक व तज्ज्ञ सहभागी झाले. 363 शोधनिबंध सादर झाले.
डॉ. जाधव म्हणाले, महिलांना संशोधनासाठी पुरेसा वेळ व सर्व संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. घर, नोकरी व जबाबदाऱ्यांचा समतोल साधून महिलांनी संशोधन क्षेत्रात पुढे यावे. विद्यार्थिनींनी करिअरच्या उच्च शिखरावर पोहोचून खऱ्याअर्थाने स्त्री-सबलीकरण घडवावे. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव पाटील म्हणाले, या महाविद्यालयाने आजवर अनेक नामवंत शास्त्रज्ञ घडवले आहेत. ही परंपरा भविष्यातही अखंड सुरू राहील.
संस्थेचे मानद सचिव सुहास पाटील म्हणाले, नावीन्यपूर्ण संशोधन, पेटंटसाठी आवश्यक ते सहकार्य संस्थेमार्फत केले जाईल. प्राचार्य डॉ. बी. पी. लाडगावकर यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. एस. एस. वाडकर यांनी करून दिली. डॉ. आर. व्ही. कुपवाडे यांनी आभार मानले. संस्था चेअरमन शांतिनाथ कांते, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आर्कि. डॉ. प्रमोद चौगुले आदी उपस्थित होते.