

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा आज, रविवारी (२३ नोव्हेंबर) सांगलीतील समडोळी येथील फार्म हाऊसवर होणारा विवाह सोहळा अनपेक्षितपणे पुढे ढकलण्यात आला आहे. लग्नाच्या मुख्य विधींच्या काही तास अगोदर स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे आनंदमय वातावरणात अचानक चिंतेचे आणि धावपळीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी (२३ नोव्हेंबर) विवाह सोहळ्याची तयारी सुरू असताना श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली. सुरुवातीला त्यांना सामान्य अस्वस्थता वाटली, मात्र प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना तातडीने सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
आज, रविवारी (दि. २३) सायंकाळी साडेचार वाजता संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्यासोबत स्मृती मानधनाचा विवाह संपन्न होणार होता. या शाही लग्न सोहळ्यासाठी क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थिती राहणार होते.
याबाबत अधिक माहिती देताना उपचार करणारे डॉ. नमन शहा यांनी सांगितले की, ‘सध्या श्रीनिवास मानधना यांची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक तपासणीनुसार, त्यांना शारीरिक ताण-तणावामुळे हा हृदयविकाराचा झटका आल्याचं दिसत आहे. पुढील एक ते दोन दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणे आवश्यक आहे.’
डॉ. शहा यांनी पुढे सांगितले, ‘पुढील तपासण्या आणि त्यांच्या प्रकृतीमधील सुधारणा बघून गरज भासल्यास त्यांच्यावर अँजिओग्राफी करावी लागू शकते. मात्र, सध्याच्या घडीला त्यांची प्रकृती नियंत्रणात आणि स्थिर आहे.’
वडिलांची अचानक तब्येत बिघडल्याने, स्मृती मानधनाने मोठा आणि भावनिक निर्णय घेतला. वडिलांची तब्येत पूर्णपणे सुधारल्याशिवाय लग्न करायचे नाही, असे तिने ठरवले आहे. त्यामुळे रविवारी दुपारी ४.३० वाजताचा मुहूर्त असलेला स्मृती आणि पलाश यांचा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. श्रीनिवास मानधना लवकर बरे व्हावेत यासाठी क्रिकेट जगतातून आणि चाहत्यांकडून प्रार्थना केल्या जात आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे विवाहस्थळी असलेला डेकोरेशनचा सेटअप काढण्याचे काम सुरू झाले असून लग्नासाठी आलेले पाहुणे परत जात आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंसह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार होते.