

कासेगाव : पेठ-शिराळा रस्त्यावर गोळेवाडीजवळील जनाई गार्डनजवळ दुचाकीवर बिबट्याने झडप घालत पंजा मारल्याने अर्चना प्रमोद पाटील (वय 34, रा. रेठरेधरण) या जखमी झाल्या.
प्रमोद पाटील, अर्चना पाटील व त्यांचा सहावर्षीय मुलगा पेठकडून दुचाकीवरून रेठरेधरणकडे निघाले होते. दरम्यान जांभुळवाडीच्या दिशेने आलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप मारली. पाठीमागे बसलेल्या अर्चना यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. बिबट्याची नखे पायाला नखे लागून त्यांना जखम झाली आहे. या हल्ल्यानंतर वाहनांचा प्रकाशझोत पडल्याने बिबट्या बाजूच्या शेतात पसार झाला. नागरिकांनी त्यांना तत्काळ पेठ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
घटनेनंतर लोकांनी वनविभागास कळवले. मात्र त्यांनी वेळेवर दखल घेतली नाही. आ. सत्यजित देशमुख यांच्या कानउघाडणीनंतर वन विभागाला जाग आली. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल दादाराव बर्गे, वनरक्षक विशाल डुबल, क्षेत्रीय सहा. शहाजी पाटील, शिवाजी खोत, अनिल पाटील, रेस्क्यू टीमचे युनूस मणेर, पांडूरंग उगळे, गौरव गायकवाड यांनी परिसरात भेट दिली. गेल्या काही महिन्यांपासून जांभुळवाडी परिसरात बिबट्याच्या नर-मादीचा वावर आहे. त्यांच्याकडून हल्ल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.