

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर झालेला खुनीहल्ला हा सुपारी देऊन झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा खून करण्यासाठी तब्बल सहा लाख रुपयांची सुपारी दिली होती. फायर सेफ्टी कंपनी ब्लॅकलिस्ट केल्याच्या रागातून संशयितांनी हे कृत्य केले होते. याप्रकरणी सुपारी घेणारा मलिक सलीम शेख (रा. बामणोली, ता. मिरज) आणि सुपारी देणारा अभिजित अनिलकुमार चव्हाण (रा. राम मंदिर चौक, सांगली) या दोघांना अटक करण्यात आली. यातील मलिक शेख याला कर्नाटकातील जमखंडी येथे पाठलाग करून पकडले.
महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्या खुनाची सुपारी देणाऱ्या अभिजित चव्हाण याची रसिका मार्केर्टिंग आणि जीएलसी ग्रुप ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनियर्स नावाची कंपनी आहे. अभिजित चव्हाण याने त्याच्या फायर सेफ्टी कंपनीला दिलेल्या मुदतीमध्ये खाडाखोड केली होती. तसेच कंपनीला मुदतवाढ देण्याची त्याने महापालिकेकडे वारंवार मागणी केली होती. परंतु अभिजित चव्हाण याची फायर सेफ्टी कंपनी वारंवार वादात असल्याने महापालिका अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी त्याच्या कंपनीचा परवाना नाकारून कंपनी ब्लॅकलिस्ट केली होती. याचा राग अभिजित चव्हाण याच्या मनात होता.
यातून दोघांमध्ये वाद देखील झाला होता. त्यातून त्याने सुनील माळी यांचा खून करण्यासाठी मलिक शेख याला तब्बल सहा लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार मलिक शेख हा सुनील माळी यांच्या पाळतीवर होता. दरम्यान, दि. 27 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास माळी हे त्यांचे मित्र शंकर बाजीराव जगदाळे यांच्यासोबत त्यांच्या दुचाकीवरून घराजवळ पोहोचले. त्यावेळी माळी यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या प्रथमेश सुरेश पाटोळे, तोहीद ऊर्फ हुसेन फारूख सुतार आणि डी. माया ऊर्फ शुभम आनंदा पारचे या तिघांनी त्यांच्यावर खुनीहल्ला केला. प्रथमेश पाटोळे याने माळी यांच्या बरगडीमध्ये चाकू मारला. त्यानंतर तिघांनी पलायन केले होते. यात माळी यांचे प्राण वाचले.
दरम्यान त्यांच्यावर मलिक शेख याने सुपारी घेऊन प्रथमेश सुरेश पाटोळे, तोहीद ऊर्फ हुसेन फारूख सुतार आणि डी. माया ऊर्फ शुभम आनंदा पारचे या तिघांमार्फत हा हल्ला केल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती. तसेच माळी यांच्यावरील हल्ल्यानंतर मलिक शेख हा देखील फरार होता. सांगली शहर पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी यासाठी सांगली शहर गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक सागर होळकर, हवालदार संदीप पाटील, गौतम कांबळे आणि संतोष गळवे यांना, मलिक शेख हा कर्नाटकातील जमखंडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकून त्याला जमखंडीमधून अटक केली. तसेच सुपारी देणारा अभिजित चव्हाण याला सांगली बसस्थानक आवारातून अटक केली.
मलक्या करीत होता देखरेख
माळी यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी मलक्या शेखही त्याच परिसरात होता. परंतु तो प्रत्यक्षात हल्ल्यात सहभागी न होता तो देखरेख करीत होता. तसेच हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांना पलायन करण्यासाठीही मलक्याने मदत केली होती.
पहिला चार, नंतर सहा लाखांची सुपारी
हल्ला करण्यासाठी सुरुवातीला चार लाख रुपयांची सुपारी ठरली होती. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला करायचा असल्याचे मलक्याने अभिजित याच्याकडे आणखी दोन लाखांची मागणी केली. त्यानुसार ही सुपारी सहा लाखांना फुटली होती.