

Kharsundi Siddhanath Yatra
आटपाडी : नाथबाबांच्या नावानं चांगभलं .... च्या जयघोषात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत खरसुंडी येथे सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत सासनकाठी व पालखी सोहळा अमाप उत्साहात पार पडला. यात्रेत सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी नाथनगरीत हजेरी लावली होती.
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक खरसुंडीत दाखल झाले होते. सिद्धनाथ व जोगेश्वरी विवाह सोहळ्यानिमित्त होणारा हा पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविक सकाळपासून मिळेल, त्या वाहनाने खरसुंडीत येत होते.
चैत्र वद्य दशमीला देवाची लोखंडी सासने धावडवाडीचे मुस्लिम व विठलापूरचे बाड यांनी स्नानासाठी घोडेखूर येथे नेली. त्यानंतर ती जोगेश्वरी मंदिरात परत आणली. आज सकाळी सासनकाठी व पालखी मिरवणुकीच्या सोहळ्यास सुरूवात झाली. पहाटे मुख्य मंदिरात अभिषेक झाल्यानंतर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीची पूजा बांधण्यात आली होती. देवाला भरजरी फेटा, अंगरखा, हातात तलवार तर देवीला लाल साडी, सौभाग्य अलंकार अशी सालंकृत पूजा आकर्षक ठरली.
सकाळी अकरानंतर गावोगावच्या सासनकाठया मुख्य मंदिरात दाखल होऊ लागल्या. मंदिराच्या आवारात सासनकाठया आल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवण्यात येत होत्या. दर्शनासाठी आलेले भाविक सासनकाठीवर गुलाल व खोबऱ्याची मुक्त उधळण करीत होते.
दुपारी एक वाजता नाथ निमंत्रक नयाबा गायकवाड यांचे वंशज प्रथम मानकरी गायकवाड बंधू यांना पुजारी बांधव मंदिरात घेऊन येतात. त्यानंतर आटपाडीचे मानकरी देशमुख यांना घेऊन येण्यासाठी पुजारी व गायकवाड जातात. त्यांना मंदिरात घेऊन आले. त्यानंतर पालखी सोहळ्यात सुरुवात झाली.
आटपाडीच्या पाटील बंधुंची पांढरी शुभ्र सासनकाठी मंदिरात दाखल झाली. यावेळी गावोगावच्या मानकऱ्यांना मंदिरात निमंत्रित करण्यात आले. दोन वाजता धावडवाडीच्या मुस्लीम व विठलापूरच्या हिंदू मानकऱ्यांनी एकत्र नैवेद्य अर्पण केला. दुपारी दोन वाजेपर्यंत मोठी गर्दी झाली.
अग्रभागी मंदिरातील पुजारी धुपारती, सेवेकरी, मानकरी, भालदार, चोपदार अशा पारंपरिक व शाही थाटाचा लवाजम्याने पालखी सह प्रस्थान केले. नगारखाना प्रवेशद्वारातून पालखी तीन वाजता मुख्य पेठेत दाखल झाल्यावर भाविकांनी चांगभलंच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण केली.
यावेळी मुख्य पेठेसह संपूर्ण आसमंत गुलाबी दिसत होता. मुख्य पेठेतून गुलाल खोबऱ्याची उधळण झेलत पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात पोहोचला. तत्पूर्वी महादेव मंदिराच्या प्रांगणात सर्व सासनकाठया पालखीला टेकवून सलामी देण्यात आली. जोगेश्वरी मंदिरात पानसुपारी झाल्यानंतर प्रथेप्रमाणे टकऱ्या घडशी यांनी सासनकाठीला टक्कर दिली. त्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला. यावेळी पालखीसोबत देवाच्या लोखंडी सासनकाठया होत्या.
चांगभलंच्या गजरात पालखी मुख्य मंदिरात पोहचल्यानंतर श्रीफळ वाढवण्यास सुरवात झाली. यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, बाजार समिती, महसूल व पोलीस प्रशासन, सेवेकरी व मानकरी यांनी परिश्रम घेतले.
यात्रेनिमित्त भरलेल्या जनावरांच्या बाजारात विक्रमी आवक झाली असून खरेदी विक्रीस सुरवात झाली आहे. जातीवंत खिलार जनावरांच्या शोधात शेतकरी व व्यापारी बाजारतळ धुंडाळून काढत आहेत. यात्रेनिमित्त आलेल्या व्यापारी वर्गास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात्रेत विविध सामाजिक संस्था व व्यक्तींच्यावतीने पाणी पुरवठा व अन्नदानाचे नियोजन करण्यात आले होते. शनिवारी दुपारी श्रींचा रथोत्सव होणार आहे.
खरसुंडी सिद्धनाथ मंदिरात हिंदू मुस्लीम ऐक्याची मोठी परंपरा जपली जाते .मुस्लिम बांधवांना लोणारी समाजातील बाड बांधवांसह लोखंडी सासनकाठी चा मान आहे. संपूर्ण मुस्लिम बांधव असलेल्या धावडवाडी गावाने लोकवर्गणीतून सिद्धनाथ मंदिर उभारले आले. त्यामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य जोपासले जात आहे. पूर्वी सिद्धनाथ मंदिरातील कपडे खरसुंडीत मोहरम सणातील ताबुतासाठी वापरले जात. या सोहळ्यात हिंदू बांधवही सामील होत . कित्येक मुस्लीम बांधव आजही सिद्धनाथ चरणी नवस बोलत असतात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा आदर्श राज्यात आदर्शवत आहे.
आटपाडी आगारातून खरसुंडी, भिवघाट, सांगोला येथे जादा बस सोडण्यात आल्याने भाविकांची मोठी सोय झाली. मंदिरात आरोग्य विभागाने अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय पथक ठेवले होते. मुख्य पेठेत घरावरून गुलाल खोबरे उधळण्यास पोलिसांनी मनाई केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा यात्रा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता.