

श्री चौंडेश्वरीदेवी (अंबाबाई) शेकडो वर्षांपासून आष्टा येथील ग्रामदैवत आहे. मूळ स्थान कर्नाटकातील बदामी हे आहे. हे प्राचीन मंदिर आहे. लाखो लोेकांचे श्रद्धास्थान असलेली ही देवी आदिशक्तीचे स्थान आहे. नवरात्रौत्सवात या आदिशक्तीची आराधना केली जाते.
शहराच्या मध्यभागी श्री चौंडेश्वरी देवीचे भव्य व पुरातन मंदिर आहे. हिंदू-मुस्लिमांसह बारा बलुतेदारांचा सहभाग असलेला तसेच राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेला श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवात कृष्ण पक्षातील दशमीपासून सत्तावीस दिवस भावई हा खेळ खेळला जातो. कर्नाटकातील बदामी येथून वाळव्याचे थोरात सरकार यांनी हा खेळ आणला. या खेळाचा पहिला मान थोरात घराण्याकडेच आहे. शेकडो वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. यामध्ये आळूमुळू, पिसे, जोगण्या, लोट, लट्टू, मुखवटे, आरगडी, रणयुद्ध, पाखरे, सती, चिटक्या-मिटक्या अशाप्रकारचे विविध खेळ खेळले जातात. मूळ नक्षत्रावर हा खेळ संपतो.
या खेळाची अख्यायिका अशी : दैत्याच्या त्रासातून सुटका करण्यासाठी नगरजनांनी श्री चौंडेश्वरी देवीकडे साकडे घातले. संकट निवारण करण्यासाठी देवीने वेगवेगळी रूपे घेऊन दैत्याचा शोध घेतला. शेवटी युद्ध करून त्याचा वध केला. हेच कथानक भावईच्या खेळातून दाखविले जाते.