

संतोष अपराज
मसुरे : नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी जत्रोत्सव सोमवार 9 फेब्रुवारी रोजी होत आहे. यादिवशी पहाटे 3 वा. पासून एकूण 10 दर्शन रांगाद्वारे भाविकांना आई भराडी मातेचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी काम चालू आहे. व्यापारी बांधवांनी दुकाने थाटण्यास प्रारंभ केला असून विविध व्यावसाईकांची आंगणेवाडी मध्ये लगबग वाढली आहे.
विविध प्रकारची दुकाने सजत असून आंगणेवाडी परिसर फुलून जात आहे. जत्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. सामाजिक संस्था व विविध पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिर व परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. आंगणेवाडी जत्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भाविकांना देवीचे दर्शन घेण्याबरोबरच अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना त्रुटी दूर केल्या जात आहेत. दर्शन रांगांसाठी मजबूत पूल आणि इतर व्यवस्था कामे अंतिम टप्यात आहेत.
‘व्हीआयपी मार्ग’ असलेल्या मसुरे -आंगणेवाडी मार्गावरील दत्तघाटी मध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित झाला आहे. देवालयालगतचे सुसज्ज विद्युत ट्रान्सफॉर्मर तसेच परिसरातील अंडरग्राऊंड विद्युत वाहिन्या यामुळे वीज व्यवस्थाही सुरक्षित झाली आहे. आंगणेवाडी मंदिराकडे येणारे सर्व रस्ते प्राधान्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. जत्रेदिवशी मसुरे- देऊळवाडा दत्तघाटी येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जादा वाहतूक पोलीस याठिकाणी तैनात करणे आवश्यक आहे. तसेच याच रस्त्यावरील पार्किंग व्यवस्था अगदी चढणीला लागून असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते याची दखल वाहतुक यंत्रणेने घ्यावी, अशी मागणी होत आहे. यात्रा कालावधीत दिव्यांग भाविकांना कणकवली आणि मालवण स्टँडकडून थेट मंदिरा पर्यंत रिक्षाद्वारे नेण्याची सोय करण्यात आली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी स्पष्ट केले.
मंदिर परिसरातील पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती करण्यात आली असून काही ठिकाणी नवीन टाक्या बसविण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, इंटरनेट, एटीएम, बस सेवा, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा नियोजनाबाबत जिल्हाधिकऱ्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. भाविकांसाठी सुसज्ज असे कायमस्वरूपी सुलभ प्रसाधनगृह उभारण्यात आले असून यात्रा परिसरात तात्पुरती प्रसाधन गृहे उभारण्यात आली आहेत.