

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. त्यांनी व छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे मत श्री. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले, छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, या मताचे होते, मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. राजकीय पक्ष, गट, संघटना मात्र स्वार्थासाठी त्यांचा वापर करून घेत आहेत. ते म्हणाले, हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. त्यांना श्रद्धांजली म्हणून धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. शनिवारी (दि. 29) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी साडेसात वाजता मूक पदयात्रा काढून त्याची सांगता करण्यात येणार आहे.
संभाजी भिडे म्हणाले, कामरा नावाच्या पद्धतीची हॉटेलं चालवणे म्हणजे डान्सबारची सावत्र भावंडे आहेत. कामराच्या विषयावरून विधानसभेत जो गदारोळ, धुडगुस, नादानपणा चालवलाय ते लोकशाहीला शोभणारा नाही. मी कुणाचे नाव घेत नाही, पण ज्यांनी ज्यांनी विधानसभेत नीचपणा केलाय ते देशद्रोहीच आहेत.
संभाजी भिडे म्हणाले, रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत छत्रपती संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते चूक आहे. वाघ्याची जी कथा सांगितली जाते ती सत्य आहे. आज माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात, तेवढी त्याकाळी कुत्री होती. हे दाखवण्यासाठी हा कुत्र्याचा पुतळा आवश्यक आहे.