

सांगली : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची दुरवस्था झाली आहे. स्टेडियमची जागा शासनाच्या मालकीची आहे. तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी पन्नास वर्षांच्या कराराने नगरपालिकेला खेळांसाठी विकास व देखभाल करण्यास दिली होती. त्यानुसार तत्कालीन नगरपालिकेने मैदान, कंपाऊंड भिंत, पॅव्हेलियन व प्रेक्षागॅलरी उभारल्या. 2019 मध्ये करार संपला. त्यामुळे महापालिकेला आता या स्टेडियमच्या विकासाचे कोणतेही विकासकाम करता येत नाही. त्यामुळे पूर्वीच्या करारास मुदतवाढ देणे, अथवा ही जागा महापालिकेकडे हस्तांतर करणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची सध्याची जागा ही महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे. 1969 च्या दरम्यान ही जागा तत्कालीन नगरपालिकेस 50 वर्षे कराराने खेळांसाठी देखभालीकरिता देण्यात आली होती. या कराराची मुदत 2019 मध्ये संपलेली आहे. कराराची मुदत वाढवावी, अथवा ही जागा महापालिकेस हस्तांतर करून मिळावी, यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी तसेच नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दोनदा पत्रे पाठविली आहेत. मात्र त्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापालिकेला निधी खर्च करता येईना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही स्वतंत्रपणे स्टेडियमच्या विकासासाठी पावले पडताना दिसत नाहीत.
सध्या स्टेडियमची अवस्था बिकट झाली आहे. परवाच्या पावसाने तर या स्टेडियमला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. अजूनही स्टेडियमध्ये पाणी साचून आहे. ते काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना गरजेची आहे. प्रत्येक पावसाळ्यात साचून राहणार्या पाण्याचा प्रश्न उद्भवतो. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची गरज आहे. महापालिका, जिल्हा नियोजन समितीची वार्षिक योजना, आमदार व खासदार फंडातून स्टेडियमचा विकास होणे गरजेचे आहे. या स्टेडियमच्या विकासासाठी 2021-22 मध्ये जिल्हा नियोजन समितीतून सुमारे 3.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र त्यातून केवळ क्रिकेटचे मैदान विकसित होणार, अन्य मैदानी खेळांना वाव मिळणार नसल्याकडे लक्ष वेधत आंदोलन झाले होते. त्यात काही कालावधी गेला. क्रिकेटसह सर्व खेळांसाठी मैदान विकसित करण्याच्या अनुषंगाने नवीन आराखडा तयार करण्यात आला. साचून राहणार्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रथम मैदानाच्या कडेने ड्रेनेज व्यवस्था केली जाणार होती. महिला व पुरुष खेळाडूंसाठी चेंजिंग रूम, वॉशरूम, स्टीम बाथ, जिम, योगा हॉल, राहण्यासाठी खोली, क्रीडांगणासाठी प्रवेशद्वार, 400 मीटर धावण्याचा ट्रॅक, कबड्डी मैदान, व्हॉलीबॉल, खो-खो, नेटबॉल, हॅण्डबॉल, 30 यार्ड क्रिकेट मैदान, बॉक्सिंग, तायक्वांदो, टेनिस बॉल क्रिकेट, फूटबॉल, क्रिकेटसाठी तीन पिच व इतर खेळांची मैदाने अद्ययावत करणे, पश्चिमेकडील गॅलरी पाडून त्याठिकाणी खोल्या, इनडोअर गेम्स, क्रीडा कार्यालय आदींचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र हे केवळ कागदावरच राहिले.