Sangli Politics : आटपाडीत शिवसेनेचे पुनरागमन; पंचायत समितीवर भगवा, जिल्हा परिषदेत २ जागा सेनेच्या खात्यात

आमदार सुहास बाबर यांची राजकीय खेळी ठरली यशस्वी
MLA Suhas Babar |
आमदार सुहास बाबरFile Photo
Published on
Updated on

प्रशांत भंडारे

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने (शिंदे गट) जोरदार कमबॅक करत भाजपला मोठा धक्का दिला. जिल्हा परिषदेच्या चारपैकी दोन जागा जिंकत शिवसेनेने तालुक्यातील राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले, तर पंचायत समितीवर ८ पैकी ५ जागा जिंकून भगवा फडकवला.

जिल्हा परिषदेच्या खरसुंडी व दिघंची या गटात शिवसेनेने विजय मिळवला. करगणी गटात राष्ट्रवादीने (अजित पवार गट) शिवसेनेच्या सहकार्याने बाजी मारली, तर निंबवडे गटात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. बहुचर्चित आणि हाय व्होल्टेज ठरलेल्या निंबवडे गटात आमदार पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर यांनी निर्णायक विजय संपादन करत भाजपची प्रतिष्ठा राखली. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

पंचायत समितीवर सेनेचा झेंडा

पंचायत समितीच्या ८ जागांपैकी ५ जागा जिंकत शिवसेनेने सत्ता पालट घडवून आणला. खरसुंडी, नेलकरंजी, करगणी, दिघंची व विठ्ठलापूर येथे सेनेने विजय मिळवला. तर माडगुळे, निंबवडे व घरनिंकी या तीन जागा भाजपच्या खात्यात गेल्या.नगरपंचायत निवडणुकीतील धक्क्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी भाजपला रोखण्यासाठी नवी रणनीती आखली होती.त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तालुक्याचे शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गट,माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, भारत तात्या पाटील,अनिल पाटील तसेच काँग्रेसचे जयदीप भोसले यांना सोबत घेत मजबूत मोट बांधल्याने सेनेला अपेक्षित दमदार यश मिळाले.सेनेने भाजपला जोरदार धक्का दिला.

भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचारयंत्रणा राबवण्यात आली होती. निंबवडे गटातील विजयामुळे भाजपने प्रतिष्ठा राखली असली तरी इतर गटांत अपेक्षित यश मिळाले नाही.तर माडगुळे गणात भाजपने निसटता विजय मिळवला. हा निकाल भाजपसाठी चिंतन करण्यास भाग पाडणारा आहे.

राजकीय समीकरणे बदलली

या निकालामुळे आटपाडी तालुक्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असून पंचायत समितीवरील सत्ता सेनेकडे गेल्याने सेनेचे बळ वाढले आहे. शिवसेनेच्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर भाजपसमोर संघटनात्मक पुनर्रचनेचे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news