

शिराळा शहर : येथील जगप्रसिद्ध नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस व वन विभागामार्फत शहरातून संचलन करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी स्टँड, लोहार गल्ली, कुरणे गल्ली, सोमवार पेठ, अंबामाता मंदिर, मेन रोड, गुरुनाग मंडळे सजावट करण्यात व्यस्त गुरूवार पेठ मार्गे संचलन केले.
नागपंचमीनिमित्त शहरातील 70 हून अधिक नाग मंडळे ट्रॅक्टर, ट्रॉली सजावटीच्या कामाला लागले आहेत. राज्यातून अनेक डीजे सिस्टिम, बेंजो पथक शहरात दाखल झाले असून त्यांनी आपली यंत्रणा जोडण्याचे काम सुरू केले आहे. अधुनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी ऊर्जा मिळत आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे युवा नेत्यांचे डिजिटल पूर्ण शहरातून लावण्यात आले आहेत.
नागपंचमीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले व पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये 1 पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक 10, सहायक पोलिस उपनिरीक्षक 38, पोलिस कर्मचारी 342, महिला पोलिस अंमलदार 50, वाहतूक पोलिस 40 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅमेरामन 11, ध्वनी मापक यंत्रे 19, ड्रोन कॅमेरे 2, अंबामाता मंदिर परिसर, मिरवणूक मार्गावर 20 सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवर 4, व्हिडीओ कॅमेरे 20, एक बॉम्बशोधक पथक , दोन दंगलविरोधी पथके, 40 वॉकीटॉकी सेट आहेत. दरम्यान, कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.