

शिराळा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्याच्या पातळीवरून नेते, कार्यकर्ते यांच्या फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. गटांची जुळवाजुळवी आणि दुसर्या गटाची तोडफोड सुरू असताना दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांचीही जोरदार तयारी सुरू झाली आहे. झेडपी आणि पंचायत समितीवर झेंडा फडकवून सत्ता मजबूत करणार्या या निवडणुकांचा तालुकानिहाय राजकीय वेध...
शिराळा तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गटात निवडणुकीचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना शिंदे गट, काँग्रेस यांच्यात काटा लढत होणार असून त्यांना अपक्षांचे आव्हान उभे असणार आहे. तालुक्यात सतत राजकीय समीकरणे बदलत असल्याने चुरस होणार आहे.
कोणाशी युती करणार, यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. गतवेळची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट व शरद पवार गट असे दोन गट झाले आहेत. भाजपमध्ये आमदार सत्यजित देशमुख आले आहेत, तर शिवसेना शिंदे गटात अॅड. भगतसिंग नाईक गेले आहेत.शिराळा पंचायत समितीच्या सत्तेत सतत सत्ताबदल होत आहे. आधी माजी आमदार मानसिंगराव नाईक व आमदार सत्यजित देशमुख यांची युती होती, तर काहीवेळा मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची युती होती. शिराळा तालुक्यातील पंचायत समितीची सत्ता ही नाईक व देशमुख यांच्यामध्ये फिरत होती. मात्र आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. माजी आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक गट दुभंगले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विराज नाईक, सम्राट नाईक, अमरसिंह नाईक, बी. के. नायकवडी यांच्यासह कार्यकर्ते तयारीस लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे चुलत बंधू अॅड. भगतसिंग नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. याचा फटका मानसिंगराव नाईक यांना बसला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या शिराळा शहरात त्यामुळे सत्यजित देशमुख यांना विधानसभेसाठी एक हजार मताधिक्य मिळाले. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मतदार संघात अॅड. भगतसिंग नाईक, पृथ्वीसिंग नाईक, विश्वप्रतापसिंग नाईक यांच्या शिवसेना प्रवेशाचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसणार आहे. शिराळा तालुक्यात त्यांनी भक्कम जाळे विणले आहे.
सत्यजित देशमुख आमदार झाल्यानंतर देशमुख गटाची ताकद वाढली आहे. तालुक्यातील चारही जिल्हा परिषद मतदार संघात देशमुख यांनी आघाडी घेतली आहे. त्याचा फायदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी होणार आहे. भाजपाचे नेते सम्राट महाडिक, केदार नलवडे, आमदार सदाभाऊ खोत, रणजित नाईक, अभिजित नाईक, जगदीश कदम यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवाजीराव नाईक यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांची धुरा रणधीर नाईक, सत्यजित नाईक यांनी सांभाळली आहे.
शिराळा तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे सम्राट शिंदे व वसंतराव कांबळे, मनसेचे तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे अॅड. रवी पाटील यांनी सागाव जिल्हा परिषद मतदार संघात तयारी सुरू केली आहे. तालुक्यातील सागाव, वाकुर्डे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघात माजी आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचे वर्चस्व आहे. कोकरूड, पणुंबे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघात आमदार सत्यजित देशमुख यांचे वर्चस्व आहे. आता शिराळा पंचायत समितीवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तयारी सुरू केली आहे.