Sangli News| योजनेची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करा

बंद पाईपलाईनने पाणी पोहोचणार ; शेतकर्‍यांची प्रतीक्षा; २१७.५५ कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा करावा
Water Scarcity Scheme
Water Scarcity Scheme
Published on: 
Updated on: 

विठ्ठल नलवडे

शिराळा : शिराळा, वाळवा आणि कराड तालुक्यातील दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईच्या भागासाठी आधार ठरलेल्या वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेच्या उर्वरित कामांना आता गती देण्याची गरज आहे. तीन टप्प्यांतील कामे पूर्ण करून जून २०२७ पर्यंत योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन असले, तरी त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. योजनेच्या पूर्णत्वासाठी आणखी सुमारे २१७.५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सत्यजित देशमुख यांनी शासनस्तरावर आक्रमक पाठपुरावा करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

वाळवा तालुक्यातील वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनची कामे सध्या सुरू असून आतापर्यंत सुमारे २८ टक्के काम पूर्ण झाले आहे. लादेवाडी, ढगेवाडी, इटकरे परिसरातील १२ किलोमीटर मुख्य वितरण नलिका, इटकरे - माणिकवाडी - कासेगाव मार्गावरील ४९ किलोमीटर नलिका, येडफाटा-वाघवाडी १६.७६० किलोमीटर नलिका, येडफाटा-बावची ३५ किलोमीटर शाखा नलिका आणि येडफाटा-पोखर्णी ११ किलोमीटर मुख्य नलिकेची कामे प्रस्तावित आहेत. यासाठी १०१.६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाई, मोरणा, शिवणी, मानकरवाडी तसेच अन्य तलावांमध्ये पोहोचत असल्याने शिराळा व कराड तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला मोठा आधार मिळाला आहे. कराड तालुक्यातील १४ गावांनाही योजनेचा लाभ होत आहे. मात्र कालव्यांऐवजी बंद पाईपलाईनचे जाळे पूर्ण झाल्याशिवाय योजनेचा अपेक्षित लाभ शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहोचणार नाही. पाण्याचा अपव्यय थांबवून थेट शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी उर्वरित कामे कागदावर न राहता प्रत्यक्षात वेगाने पूर्ण करण्याची गरज आहे. त्यामुळे निधीअभावी योजना रखडू नये आणि २०२७ ची मुदत चुकू नये, यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून कामांना गती द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news