

शिराळा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिराळा तालुक्यातील दोन संचालक पदांसाठी शांततेत व चुरशीने मतदान झाले. ९५.६३ टक्के मतदान झाले. २२९ पैकी २१९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी कमी होती. मात्र, दुपारनंतर मतदानासाठी गर्दी वाढली. दुपारी १ वाजेपर्यंत एकूण २२९ मतदारांपैकी १९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी २.३० पर्यंत ९१ टक्के मतदान झाले. ब गटातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये कांबळे कृष्णा धोंडी, बेले विलास पांडुरंग आणि मदाळे बाबासोा शिवाजी यांचा समावेश आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातूनही तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये संभाजी बाबुराव कचरे, पारेकर अमित शंकर आणि माने शंकर यल्लापा यांचा समावेश आहे.बिनविरोध निवडून आलेले संचालक विराज नाईक आणि रणधीर नाईक यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती.