

आष्पाक आत्तार
रणावती : चांदोली परिसरासह सागाव, शेडगेवाडी, मणदूर, गिरजवडे, उखळू आणि परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. शेडगेवाडी येथे शाळेच्या परिसरात बिबट्या घुसल्याची घटना, भर वस्तीत कुत्र्यांची शिकार शाळकरी मुलांवर झालेले हल्ले यामुळे शिराळा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे तर सोडाच; दिवसा शेतात जाण्यासही नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे.
बिबट्यांचा वावर जंगलाच्या हद्दीपुरता मर्यादित राहिलेला नसून थेट मानवी वस्त्यांमध्ये वाढला आहे. शेळ्या, मेंढ्या आणि कुत्र्यांची शिकार करणारे बिबटे आता मानवी जीवितासाठीही धोका ठरत आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शाळेत बिबट्या; पालकांची चिंता वाढली
शेडगेवाडी येथील शाळेच्या परिसरात गत आठवड्यात बिबट्या आढळून आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शाळा आणि परिसरात वनविभागाने विशेष गस्त घालावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. चांदोली परिसरात तर अनेक विद्यार्थी दर्या खोऱ्यातून पायपीट करून शाळेला येत आहेत.लहान मुले शाळेत ये-जा करीत असताना बिबट्याचा वावर आढळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सीसीटीव्हीत बिबट्याचा वावर
चार दिवसांपूर्वी मणदूर येथे भर वस्तीत बिबट्याने पाळीव कुत्रा उचलून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच गिरजवडे येथे भिकाजी कांबळे यांच्या घराजवळ मध्यरात्री बिबट्या फिरताना आढळला. २४ ऑगस्ट रोजी जितेंद्र देशमुख यांच्या घरातील कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला केला होता. सागाव येथील अक्षय पाटील यांच्या शेतातील वस्तीवर वन्यप्राण्याने शिकार केल्याची घटना घडली आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गावोगावी बिबट्याची दहशत
काळोखेवाडी, मिरूखेवाडी, बेर्डेवाडी, इनामवाडी, उखळू, मणदूर, सोनवडे, शेडगेवाडी, खुंदलापूर, विनोबा ग्राम आणि जाधववाडी या भागांत बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. पुणे-बेंगळूर महामार्गालगतही बिबट्यांचा वावर आढळत असून, वाहनांच्या धडकेत बिबटे मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही घडत आहेत.
बालकांवरील हल्ल्यांचा इतिहास
शिराळा तालुक्यात यापूर्वीही बिबट्यांच्या हल्ल्यांच्या गंभीर घटना घडल्या आहेत. जुलै २०२५ मध्ये गिरजवडे-मुळीकवाडी येथे चार वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला होता. तडवळे आणि अमृतनगर येथे अनुक्रमे ११ महिन्यांच्या आणि सहा वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या वाढत्या बिबट्या वावराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
‘पिंजरे लावा, बंदोबस्त करा’
शिराळा तालुक्यातील ग्रामस्थांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत, वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी आणि संवेदनशील गावांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी केली आहे.
ड्रोनद्वारे शोधमोहीम
वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांनी सांगितले की, बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन तसेच वनकर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी रात्री-अपरात्री एकट्याने घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रश्न कायमच! बिबट्या जंगलाबाहेर का येत आहेत?
अभयारण्यातील भक्ष्याची उपलब्धता, पाण्याचे स्रोत, मानवी वस्त्यांलगत उपलब्ध होणारे खाद्य आणि वाढता मानवी हस्तक्षेप यांचा बिबट्यांच्या हालचालींवर परिणाम होतो का, याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. बिबट्यांच्या हालचालींचे नियमित निरीक्षण, कॅमेरा ट्रॅप, ड्रोन सर्व्हे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे.