

महेश कुलकर्णी
शिराळा शहर : शिराळा तालुक्यात मार्चमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या होत्या. तलाव, विहिरी कोरड्या पडल्या होत्या. पाण्याची मागणी वाढली होती. परंतु गेल्या मान्सूनपूर्व पावसाने तलाव व विहिरींची पाणी पातळी झपाट्याने वाढली. पाणीपुरवठा विभाग व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी काटेकोरपणे नियोजन केल्याने पाण्याचे स्रोत दिवसेंदिवस वाढले. पाण्याची टंचाई, अवकाळीचा दणका आणि त्यानंतर आलेला महापूर असे तीन वेगवेगळे निसर्गाचे चढ-उतार शेतकर्यांची परीक्षा बघणारे ठरत आहेत. आणि त्याचा निकाल हा फक्त नुकसान असाच आहे. या नैसर्गिक आपत्तीत बळीराजा भरडला जात आहे.
शिराळा तालुक्यात भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांचा धरलेला पिछा सुटता सुटत नव्हता. शेतकरी अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला होता. यामुळे खरीप हंगाम निम्मा वाया गेला. पिकांचे अतोनात नुकसान आणि नदीनाल्यांना भर उन्हाळ्यात आलेला पुराबरोबरच सर्वसामान्यांची कंबर मोडली. परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांची तारांबळ उडाली आहे.
तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 63 हजार 410 असून त्यापैकी पिकाखालील क्षेत्र 38 हजार 852 हेक्टर आहे. त्यापैकी 29 हजार 130 हेक्टरमध्ये पेरण्या होण्याचा कृषी विभागाचा अंदाज होता. मात्र, पावसाने उघडीप दिली नाही व मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली त्यामुळे यामधील निम्मे क्षेत्र शेतात पाणी साचल्याने व जमिनी हाताखाली येणार नसल्याने पेरणीअभावी वाया गेल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील 49 पाझर तलावांपैकी 15 तलाव एप्रिलमध्ये पूर्ण कोरडे पडले होते. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली होती. यावर्षी मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने जून महिन्याच्या पूर्वार्धातच पाझर तलावात पाणीसाठा वाढण्याची ही पहिलीच वेळ होती. साधारण या महिनाभरात सरासरी 25 ते 50 टक्के पाणीसाठा वाढल्याने तलाव परिसरात असणार्या सिंचन विहिरी व कुपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. याचा फायदा शेतकर्यांना झाला. जूनमध्येच सर्व 49 तलाव भरण्याची ही पहिलीच वेळ होती. परंतु या आठवड्यात कोसळणार्या पावसामुळे आठ दिवसांत होत्याचे नव्हते झाले. महापुरामुळे साधारण एक हजार एकर शेतीचे नुकसान झाले. नदी, नाले, तलाव, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामध्ये ऊस, भात, सोयाबीन आणि पालेभाज्यांचे नुकसान झाले. पाणी ओसरल्यानंतर प्रत्यक्ष पिकांचा पंचनामा सुरू होणार आहे. यामुळे बळीराजा पूर्ण कोलमडून पडला असून नुकसानीची मदत मिळावी, अशी मागणी करत आहेत.