

शिराळा शहर : काही वर्षांपासून तोट्यात चाललेले शिराळा एसटी बस आगार एप्रिल महिन्यात 44 लाख 83 हजार रुपयांनी नफ्यात आले. एवढेच नव्हे तर या आगाराने सांगली विभागात सर्वात जास्त नफा मिळवून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे काम आणि नवीन जादा दहा बसेस, यामुळे आगार नफ्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कोरोना काळापासून या आगाराला उतरती कळा लागली होती. अगोदर 92 बसेस या आगारात होत्या. त्यातील काही भंगारात गेल्या तर काही बसेस इतर आगारांना देण्यात आल्या. इतर आगारांना देण्यात आलेल्या बसेस पुन्हा आल्याच नाहीत. यामुळे येथील बस फेर्यांचे गणित बिघडले होते. तत्कालीन आगार प्रमुख म्हणून संजय चव्हाण यांनी पदभार घेतल्यानंतर आगार सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची बदली झाली. यानंतर आलेल्या आगारप्रमुख धन्वंतरी ताटे यांनीही प्रयत्न केला, मात्र बसेसची संख्या कमी असल्याने मर्यादा येत होत्या.
दरम्यान, 30 मार्चला दहा नवीन बसेस या आगाराला मिळाल्या. परंतु, चालक, वाहक संख्या आहे तेवढीच आहे. उपलब्ध मनुष्यबळावर यंत्रणेने योग्य नियोजन केल्याने हे आगार नफ्यात आले. दैनंदिन वीस हजार किलोमीटरचे उद्दिष्ट पूर्ण करून गतवर्षीपेक्षा एप्रिल महिन्यात 19 हजार किलोमीटरने वाढ झाली.
एप्रिल महिन्यात सवलतीसह 3 कोटी 72 लाख इतके उत्पन्न मिळाले. महिन्याचा डिझेलचा खर्चच साधारण 1 कोटी 35 लाख आणि कर्मचार्यांचे पगारासाठी 1 कोटी 22 लाख रुपये खर्च होतात.
या यशामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. तसेच नवीन बसेसना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे आगार नफ्यात आले. बसेसची संख्या वाढली, मात्र चालक, वाहक आहेत तेवढेच आहेत, तरीही सर्वांनी एकदिलाने काम केले, त्यामुळे हे यश मिळाले आहे.
धन्वंतरी ताटे, आगारप्रमुख, शिराळा
आम्हा कर्मचार्यांच्या काही किरकोळ मागण्या, अपेक्षा असतात. त्या पूर्ण होणे, शाबासकीची थाप आणि योग्य मानसन्मान मिळणे एवढीच अपेक्षा असते. आगार फायद्यात आले आहे, याचा सर्वांना अभिमान आहे.
विकास कांबळे, अध्यक्ष, एसटी कामगार सेना कामगार संघटना, शिराळा आगार