

शिराळा शहर : शिराळा शहरातील नायकुडपुरा परिसरात मंगळवार, दि. ४ रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत अवघ्या काही तासांत सहाजणांना चावा घेतला. या हल्ल्यात चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर पुन्हा एकदा तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय शंकर गायकवाड (वय ५६) हे सकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून शेताकडे जात असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पायाचा लचका तोडला. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास कृष्णाजी बळवंत नलवडे (वय ८७), अभिषेक राजेंद्र हसबनीस (वय २९), मयूर मधुकर वासुलकर (वय ५९) आणि प्रतीक संजय हिरवडेकर (वय २१) हे दुचाकीवरून जात असताना त्यांनाही या कुत्र्याने चावा घेतला. तसेच, बसस्थानकाकडे पायी निघालेल्या पूनम पांडुरंग पाटील (वय ६५) यांनाही या कुत्र्याने जखमी केले.
या घटनेत कृष्णाजी नलवडे, अभिषेक हसबनीस, पूनम पाटील आणि संजय गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अनिरुद्ध काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींवर तातडीने उपचार केले. गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, उर्वरित दोघांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.
घटना समजताच नगराध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, सभापती राजसिंह पाटील, नगरसेविका अर्चना कदम, सीमा कदम, शिवानी नलवडे, संभाजी नलवडे, वसंत कांबळे व राम जाधव यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. पिसाळलेल्या व आक्रमक कुत्र्यांना पकडण्यासाठी तातडीने मोहीम राबवावी. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण नियमितपणे व्हावे, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.