

शिराळा शहर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘यशवंत पंचायतराज’ अभियान 2023-24 अंतर्गत शिराळा पंचायत समितीने दोन सन्मान प्राप्त करून जिल्ह्यात मानाचा तुरा रोवला आहे. सुमारे 26 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन पंचायत समितीचा सन्मान करण्यात येणार आहे.
शिराळा पंचायत समितीने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावून 15 लाख रुपयांचे पारितोषिक, तसेच पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवून 11 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले असून, एकूण 26 लाख रुपयांची बक्षिसे शिराळा तालुक्याच्या वाट्याला आली आहेत.
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सहभाग घेत शिराळा पंचायत समितीने राज्यपातळीवर कामगिरी नोंदविली. या यशामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे नेतृत्व, परिणामकारक मार्गदर्शन आणि तंत्राधिष्ठित नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरले. याशिवाय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे व शशिकांत शिंदे तसेच गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे हे यश मिळाले आहे. या यशाबद्दल खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक तसेच उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत यांनी शिराळा पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले.