Sangli News : शिराळा नगरपंचायतीचा 46.45 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

शहराच्या डिजिटल विकासावर भर
Sangli News
शिराळा नगरपंचायतीचा 46.45 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
Published on
Updated on

शिराळा शहर : शिराळा नगरपंचायतीच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा एकूण 46 कोटी 45 लाख 25 हजार रुपयांचा अर्थसंकल्प विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. या अर्थसंकल्पात 11 लाख 12 हजार 256 रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली असून शहराच्या सौंदर्यीकरणासह पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.

येथील नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजित विशेष सभेत या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. यावेळी 11 लाख 12 हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आले. यामध्ये सुरुवातीची शिल्लक 20 लाख 11 हजार रुपये, महसुली प्राप्त रक्कम 6 कोटी 87 लाख 64 हजार, भांडवली जमा 39 कोटी 37 लाख 50 हजार रुपये, अशी एकूण 46 कोटी 45 लाख 25 हजार जमा, तर 39 कोटी 65 लाख रुपये भांडवली खर्च, 6 कोटी 69 लाख 13 हजार रुपये महसुली खर्च, असा एकूण 46 कोटी 34 लाख 13 हजार रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. 11 लाख 12 हजार 256 रुपये शिल्लक असणारा हा अर्थसंकल्प आहे.

या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खालील महत्त्वाच्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवीन भव्य प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल. शहराच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र अग्निशमन दलाची स्थापना करण्यात येणार आहे. शहर सौंदर्यीकरण उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी सुंदर बागबगीचे विकसित करण्यात येतील. जलशुद्धीकरण व घनकचरा व्यवस्थापन उपक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याची शुद्धता आणि कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक यंत्रणा उभारण्यात येईल. ‌‘डिजिटल शिराळा‌’ उपक्रमांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे, ऑनलाईन सेवा आणि माहिती दर्शविणारे डिजिटल स्क्रीन बसविण्याचा संकल्प आहे.

मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. यावेळी उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे, बांधकाम सभापती राजसिंह पाटील, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पाटील, पाणीपुरवठा सभापती सचिन डांगे यांच्यासह सर्व नगरसेवक, लेखापाल हणमंतराव कांबळे व अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news