

ऐतवडे बुद्रुक : शिराळा, लाडेगाव रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे या मार्गावरून नियमित धावणार्या एस. टी. बसच्या फेर्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे ‘गुरुजी लाल परी येईना, शाळेत कसे येऊ’ असा केविलवाणा सवाल विद्यार्थी शिक्षकांना करत आहेत.
शिराळा, लाडेगाव दरम्यानच्या रस्त्याचे धीम्या गतीने काम सुरू आहे. संततधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. लाडेगाव, ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी, कार्वे आदी गावातील विद्यार्थी, प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिराळा ते लाडेगाव दरम्यानच्या रोजच्या पाच बस फेर्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. बसफेर्या बंद असल्याने शाळेत जाता येत नाही, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची कैफियत शिराळा आगारांमध्ये जाऊन पालकांसह स्थानिक नेते मंडळींनी मांडली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आगार प्रमुखांनी एसटी बसेस सुरू केल्या, पण या रस्त्यामध्ये एस. टी. बसचा जीवघेणा अपघात होता होता वाचला. त्यामुळे पुन्हा बस फेर्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.