

शिराळा शहर : शिराळा शहर नागपंचमीसाठी सज्ज झाले आहे. मंगळवार दि. 29 रोजी होणारा नागपंचमी उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झाली आहे. स्वागत कमानी, नागराज मंडळांचे फलक आदींनी शहर गजबजून गेले आहे. शहरात वातावरण भक्तिमय झाले आहे.
प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार शामला खोत यांनी सर्व विभागाच्या आढावा बैठका घेऊन यंत्रणांना सूचनाही दिल्या आहेत. ग्रामदेवता अंबामाता मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी गायकवाड, सम्राट शिंदे यांनी केली आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर परिसरात मेवामिठाई, खेळण्यांसह विविध स्टॉल दाखल झाले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील व डॉ. एन. बी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. बसस्थानक, नगरपंचायत, व्यापारी हॉल, पाडळी नाका, शनिमंदिर, समाजमंदिर, नायकुडपुरा आदी सात ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्य पथके सज्ज आहेत. शहरात 52 आरोग्य सर्वेक्षण पथके तयार केली आहेत. पाणी तपासणी व हॉटेल्स, खाद्यपदार्थ स्टॉलची तपासणी सुरू आहे. अत्यावश्यक बाबीसाठी उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
वन खात्याने उपवनसंरक्षक सागर गवते व वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली 1 उपवन संरक्षक, 1 विभागीय वन अधिकारी , 6 सहायक वन संरक्षक, 20 वनक्षेत्रपाल, 20 वनपाल, 38 वनरक्षक, 54 वनमजूर, 10 पोलिस कर्मचारी, गस्ती पथक, फोटोग्राफर, सर्पमित्र, तपासणी नाके, ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही तसेच सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
उत्सवासाठी येणार्या भाविकांसाठी शिराळा आगारात 38 व इतर आगारात 20 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शिराळा ते इस्लामपूर, शिराळा-बांबवडे, शिराळा-कोडोली या मार्गावर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. शिराळ्याकडून इस्लामपूरकडे जाणारी वाहतूक कापरी, कार्वे, लाडेगाव मार्गे जाणार आहे. इस्लामपूरमधून शिराळ्याकडे येणारी वाहतूक पेठ मार्गे एकेरी होणार आहे.
शिराळा ते कोकरूड मार्गावरील तात्पुरते बसस्थानक नाईक महाविद्यालय, वाकुर्डे-शिरशी मार्गासाठी पाडळी रोड येथे राहणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे यांनी दिली. यात्रा कालावधीत विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याची खबरदारी उपकार्यकारी अभियंता एल. बी. खटावकर यांनी घेतली आहे. मिरवणूक मार्गावर प्रत्येक चौकात विद्युत कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागपंचमीदिवशी प्रतिकात्मक नागाच्या मिरवणुकीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून नामांकित बँड, बेंजो आदीसह पारंपरिक वाद्ये दाखल होणार आहेत.