

ऐतवडे बुद्रुक : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीबरोबर पेच-डावपेचांना शिराळा विधानसभा मतदारसंघात असलेल्या वाळवा तालुक्यातील 48 गावांत वेग आला आहे. वारणा पट्ट्यातील गावा-गावात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकांना गती आली आहे. परिणामी एक एक मत लाखमोलाचे ठरणार असल्याने उमेदवाराने एकगठ्ठा मतांसाठी कार्यकर्त्यांना फिल्डिंग लावण्यास सूचना देऊन सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत 48 गावांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आपापली ताकद दाखवून सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. साधारणपणे ग्रामीण भागात एक गट मतदानाचे पॉकेट म्हणून काही प्रभाग काही ठराविक मंडळी यांना ओळखले जाते. सुशिक्षित समजले जाणारे मतदार अनेकदा मतदानाला बाहेरही पडत नाहीत. त्यामुळे उमेदवार मताधिक्यासाठी प्रामुख्याने या विशिष्ट मंडळींवर अवलंबून असतात. काही वर्षांपूर्वी एकमेकांचे विरोधक असणारे एकाच व्यासपीठावर आले असल्याचे चित्र आहे. संबंधित समाजाच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून आपल्याला मतदान व्हावे यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न जोर धरू लागले आहेत. यातून राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.