

शिगाव : पुढारी वृत्तसेवा
वारणा नदीला पुन्हा पूर आला आहे. शिगाव येथील वारणा बंधारा दुसर्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, शिगाव येथे जुना कोरेगाव रस्ता पुन्हा पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच शिगाव, बागणी भागात पावसाची संततधार सुरूच आहे.गेल्या महिन्यात वारणेला पूर आला होता. त्याचे पाणी ओसरून शेतकरी आश्वस्त होत असतानाच पुन्हा नदीचे पाणी वाढले आहे. नदीकाठावरील शेकडो एकर शेतीमधील पिके पाण्याखाली गेली आहेत.
वारणा नदीच्या महापुराचा नदीकाठच्या पिकांना फार मोठा फटका बसला आहे. सलग दुसर्यांदा ऊसपिके पाण्यात बुडाली आहेत. त्याचबरोबर आगाप सोयाबीन, हळद आणि भाजीपाला पिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. वारणाकाठच्या बहुतेक सर्व गावांत उसाचे क्षेत्र मोठे आहे. नदीकाठच्या शिवारात महापुराचे पाणी पसरले आहे. पिके पुराच्या पाण्याखाली आहेत. याचा विशेषत: कोवळ्या ऊसपिकाला फार मोठा फटका बसू लागला आहे. शेतकर्यांनी मोठा खर्च करून पिकवलेल्या पिकांचे अपरिमित नुकसान होऊ लागले आहे.