

सांगली : महापालिकेतील सत्तेत काँग्रेस सोडून सर्व पक्षांना सोबत घेण्यात येणार असल्याचे भाजप नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेले आहे. त्या दिशेने दमदार पावलेही पडत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी महापौर, उपमहापौर निवडीपूर्वी भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते, नगरसेवक येथील एका हॉटेलवर एकत्र आले होते. त्या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तीनही नगरसेवक उपस्थित होते. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली होती. या आघाडीशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने अघोषित समझोता करून निवडणूक लढवली होती. भाजप, शिवसेना, शिवसेना उबाठा हे पक्षही स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. भाजपचे बहुमत एका जागेने हुकले. आता महापालिकेतील सत्तेसाठी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती झाली आहे. या युतीकडे आता तगडे बहुमत आहे. तरीही भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत काँग्रेस सोडून अन्य सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा इरादा स्पष्ट केलेला आहे. अगदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही सोबत यायला तयार असेल, तर त्यांना काय देता येईल, हे पाहू, असेही त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पावले भाजपच्या दिशेने पडू लागल्याच्या खुणा दिसू लागल्या आहेत. काल, मंगळवार, दि. 19 रोजी महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते, सर्व नगरसेवक यांची बैठक येथील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, महापौर पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार धीरज सूर्यवंशी, उपमहापौर पदाचे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार गजानन मगदूम, भाजपचे नेते सुरेश आवटी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, भाजपचे गटनेते संदीप आवटी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी व दोन्ही पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते.