

इस्लामपूर : आमचे नेते आमदार जयंत पाटील यांची आ. गोपीचंद पडळकर जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत जिल्ह्यात पडळकर यांच्याविरोधात आंदोलन सुरूच ठेवू, त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथे निषेध मोर्चावेळी दिला. यावेळी पडळकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून निषेधाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पडळकर यांच्या निषेधार्थ आज, शनिवारी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. रास्ता रोकोही करण्यात येणार आहे.
लोकनेते राजारामबापू यांचा एकेरी उल्लेख करत आ. पडळकर यांनी आ. जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेकांनी पडळकर यांच्या वक्तव्याचा चांगलाच तिखट शब्दात समाचार घेतला. जोपर्यंत पडळकर आ. जयंत पाटील यांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याविरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. भाजपने पडळकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील म्हणाले, आ. पडळकर यांची लायकी नसताना ते आ. जयंत पाटील यांच्यावर टीका करीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी असल्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालावा. यातून वाळवा तालुका पेटून उठल्यावर प्रशासनास आवरता येणार नाही. जतमधील अभियंता आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे. परंतु अजून संबंधितावर गुन्हा दाखल झालेला नाही. आता पडळकर हे आ. जयंत पाटील यांच्यावर टीका करून प्रशासनाचे लक्ष विचलीत करण्याचे काम करत आहेत. पक्षाचे शहर अध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, पडळकर यांना स्वत:च्या गावात, आटपाडी तालुक्यात किंमत नाही. त्यांची समाजातील किंमत संपली आहे. त्यांची किंमत बिरोबाने संपविली आहे. आ. पडळकर यांनी माफी मागावी, नाही तर हे आंदोलन असेल चालू राहणार आहे.
अॅड. धैर्यशील पाटील म्हणाले, पडळकर यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीमुळे राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करायला हवा. माजी नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले, हा स्वाभिमानी वाळवा तालुका आहे. आमच्या अस्मितेला कोणी धक्का लावत असेल, तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. झुंझारराव पाटील म्हणाले, आता आमचा संयम संपला आहे. असे वक्तव्य करणार्यास आवर घालावा. अन्यता प्रशासनास अवघड जाईल. संभाजी कचरे म्हणाले, पडळकर आता राजकारणात आला आहे. शिक्षकांचा मुलगा म्हणतो, पण हा शिक्षकांचा नसावा. त्याने बिरोबाची खोटी शपथ घेतली आहे. त्याने आ. जयंत पाटील यांची माफी मागावी. सुनीता देशमाने म्हणाल्या, आमदार पाटील यांची राजकारणातील वर्षे तुझ्या वयाएवढी आहेत. वाळवा तालुक्यातील महिला तुला घरात येऊन बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाहीत. अरुणादेवी पाटील म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस यांनी असल्या आमदारांना आवर घालावा. आमदारांनी काय विकास केला आहे हे सांगावे.
याप्रसंगी विशाल माने, पुष्पलता खरात, सुनील मलगुंडे, अशोक वाटेगावकर, भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, शिवाजी चोरमुले, शैलेश पाटील, सी. व्ही. पाटील, लालासाहेब अनुसे, माणिक शेळके, शिवाजी वाटेगावकर, अर्जुन माने, रोझा किणीकर, खंडेराव जाधव, छाया पाटील, डॉ. योजना शिंदे, संजय पाटील यांनी आ. पडळकर यांच्यावर टीका केली व निषेध केला. बँकेचे माजी अध्यक्ष शामराव पाटील, अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, बाजार समिती अध्यक्ष अशोक पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अरुण कांबळे, युवक अध्यक्ष संग्राम जाधव, पुष्पलता खरात, विश्वजित पाटील, विविध संस्थांच संचालक, कार्यकर्ते उपस्थित होते.