

कुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा परिषदचे माजी सदस्य शरद लाड भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील गुरुवार, दि. 7 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. सायंकाळी 5.45 वाजता क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखाना कुंडल येथे आगमन व क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक तसेच क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड स्मारकस्थळी भेट व आढावा, असे त्यांचे नियोजन आहे. सायंकाळी 6.15 वाजता प्रशासकीय कार्यालय, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यावर शरद लाड यांची ते सदिच्छा भेट घेणार आहेत. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री पाटील महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर कुंडल येथे प्रथमच येत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यात जाहीर होणार आहेत. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुमारे एक वर्षानंतर होणार आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपकडे असणारा पुणे पदवीधर मतदारसंघ प्रथम क्रमांकाच्या मोठ्या मताधिक्याने आपल्याकडे खेचून आणला होता. महाविकास आघाडीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी अरुण लाड यांना देऊ केली होती. विद्यमान आमदार अरुण लाड यांचा पाचही जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणीच्या निमित्ताने 2007 पासून जनसंपर्क राहिला आहे.
पुणे पदवीधर मतदार संघात उमेदवारीसाठी शरद लाड इच्छुक आहेत. शरद लाड यांचा पाचही जिल्ह्यांत पदवीधर नोंदणी व अन्य कारणांनी जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व शरद लाड यांच्या क्रांती कारखाना कार्यस्थळावर होणार्या सदिच्छा भेटीदरम्यान भाजप प्रवेशाबाबत चर्चा होईल, अशी शक्यता आहे.