

कुंडल : लावण हंगाम 2025-26 मध्ये शेतकर्यांचा समूह करून त्यांचे एकत्रित शेतीवर कृत्रिम बुध्दिमत्ता आधारित ऊस लागवड प्रकल्प राबविण्याचा निर्णय व्यवस्थापन मंडळाने घेतला आहे, अशी माहिती क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली.
ते म्हणाले, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी जगभरातील तज्ज्ञ व संस्था यांना सोबत घेऊन हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचे प्रयोग व क्रांतीने मागील हंगामात केले होते. ही प्रात्यक्षिके यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याने या हंगामात के. व्ही. के., व्ही. एस. आय., पुणे व राज्य सहकारी साखर संघ यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये 25 शेतकर्यांचा एक गट, अंदाजे 65 ते 70 एकर क्षेत्र याचा समावेश आहे. प्रकल्पामध्ये सहभागी होणार्या शेतकर्यांना ठिबक सिंचन व ऊस लागवडीसाठी आवश्यक बेणे, खते, औषधे इत्यादी सर्व निविष्ठा कारखाना उधारीने पुरवठा करणार आहे.
तसेच या कामासाठी 25 हजार रुपये प्रती शेतकरी-प्रती हेक्टर इतका खर्च असून, यापैकी 16 हजार रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. जे शेतकरी फेब्रुवारीअखेरपर्यंत ऊस लावण करणार आहेत अथवा खोडवा पीक घेणार आहेत, अशा शेतकर्यांनी या प्रकल्पामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.